उद्धव ठाकरेंकडून मोदींना दरवाजे बंद

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील 13 जागांवरील मतदानाच्या अंतिम टप्प्यावर असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत समेट होण्याची शक्यता धुडकावून लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत’ या विधानाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, अशा वक्तव्यांतून मोदींच्या मनातील गोंधळाशिवाय दुसरे काहीही दिसत नाहीत. ”जे मला ‘नकली संतान’ किंवा शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ म्हणतात, त्यांच्याकडे परत जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही” असे एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा संदर्भ देत त्यांनी पक्ष सोडलेल्या 40 गद्दारांसाठी आपले दरवाजे ‘100 टक्के बंद’ असल्याचे सांगितले. पुन्हा सत्तेत आल्यास शिंदे सरकारच्या काळात झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करणार, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेणार असल्याचे सांगताना अदानी समूहाला अनुकूल असे नियम बनवले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

तसेच, पंतप्रधान संभ्रमात आहेत. हे देशासाठी चांगलं नाही. त्यांना आता दिशाच सापडत नाही. लोकांनी दोन वेळा त्यांचे खोटे ऐकले. पण आता लोकांचा त्यांच्यावर विश्‍वास नाही. मला ‘नकली संतान’ किंवा शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ म्हणणार्‍यांकडे परत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. ही देशाची निवडणूक आहे, त्यामुळे त्यांनी भाजपचा 2014 आणि 2019 चा जाहीरनामा आणि त्यांनी काय साध्य केले, याबद्दल बोलले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

Exit mobile version