ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांचे मत
| अलिबाग | प्रतिनिधी |
दाऊद हा पाकिस्तानमध्ये आहे की, नाही हेसुध्दा पाकिस्तान सांगू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती दाऊदमुळे अडकीत्यातील सुपारीसारखी झाली आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी केले आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झाल्याचे समोर आले आहे. अलिबाग जिल्हा न्यायालयात एका केससंदर्भात ज्येष्ठ वकील उज्वल निकम उपस्थित होते. त्यावेळी दाऊद इब्राहिमबाबत उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. अधिकृतरित्या पाकिस्तान हे मान्य करू शकत नाही की, दाऊद आमच्या भूमीत आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाला आणि दुसरी बाब म्हणजे, हा विषप्रयोग भारताने केला, असेही बोलू शकत नाही. पाकिस्तानची भूमिका आधीपासून दाऊद आमच्या भूमीत नाही, तसेच परवेझ मुशरफ हेसुध्दा भारतात आले होते, तेव्हा हेच बोलले होते, असे ॲड. निकम म्हणाले.
पाकिस्तानचे दुटप्पी बोलणे जगासमोर येऊ नये, यासाठी सकाळपासूनच पाकिस्तानातील इंटरनेट सुविधा बंद केली आहे. हे केव्हा घडते जेव्हा पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी घडते किंवा पाकिस्तानमधील काही घटना या जगासमोर उघड होऊ नये, त्यावेळी असे प्रकार पाकिस्तान करतो. आपल्या देशात असे घडत नाही. पाकिस्तानमधील पत्रकारांनी हे जाहीर केले आहे. त्यांनी दाऊदवर विषप्रयोग झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. अमेरिकेनेही दाऊदला मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. कारण दाऊद हा अल कायदा या दहशतवादी संघटनेला मदत करीत होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दाऊद हा आरोपी होता. दुबई येथे हा कट रचण्यात आला होता. या कटात कोण कोण सामील होते. याचा खुलासा कटात सामील असलेल्या एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनवून न्यायालयात केला होता. या आरोपीने कट कसा रचला, पाकिस्तानमध्ये कसे नेले, पाकिस्तान विमानतळावर पासपोर्ट कसे तपासण्यात आले नाही. यावरून पाकिस्तान सरकारचे त्यांना सहाय्य होते, ही बाब स्पष्ट होते. त्यावेळी भारताशी युद्ध केल्याचा आरोप करण्यात आला नाही.
मुंबई पोलिसांनी हा आरोप लावला, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. याला अनेक कारणे असू शकतात. त्यानंतर दाऊद हा दहशतवादी म्हणून हवा होता, तो मिळत नव्हता. आम्ही म्हणत होतो तो पाकिस्तानमध्ये लपला आहे. मात्र ते नाकारत होते. आता लबाड लांडग्याचे पाकिस्तानचे ढोंग उघडकीस आले आहे, असेही निकम म्हणाले.