भ्रष्टाचाराचे आरोप होताच पापड मशीन बचत गटाच्या स्वाधीन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत अजब कारभार स्थानिक तरुणांनी बाहेर आणला आहे. 26 जून रोजी ग्रामपंचायतीने गावातील महिला बचत गटासाठी पापड मशीन खरेदी केले होते. तब्बल 82 हजार रुपये खर्च करून खरेदी केलेले पापड मशीन हे काही त्या बचत गटाला मिळाले नाही. मात्र, हा घोटाळा स्थानिक तरुणांनी ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाची रक्कम ऑनलाईन तपासली आणि ग्रामपंचायतीचा हा घोटाळा बाहेर आला. दरम्यान, ग्रामपंचायतीनेदेखील प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते अशी शक्यता लक्षात घेता अवघ्या दुसऱ्याच दिवशी ते पापड मशीन महिला बचत गटाच्या ताब्यात देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायतीने 26 जून 2024 रोजी स्वतःच्या अधिकारात महिला बचत गट यांच्यासाठी पापड बनविण्याची मशीन खरेदी केली होती. मात्र, 18 जुलैपर्यंत संबंधित पापड बनविण्याचे मशीन महिला बचत गटाला पोहोचले नव्हते. मात्र, त्याआधी काही दिवस उकरूळ गावातील तरुणांनी आपली ग्रामपंचायत काय करते हे पाहण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतचा जमाखर्च तपासला. त्यावेळी सर्वांना धक्का बसला आणि त्यावेळी महिन्यापूर्वी तब्बल 82,117 रुपये रोखीत खर्च केले आहेत. मात्र, ते पापड बनविण्याचे मशीन काही महिला बचत गटाला मिळाले नव्हते. त्याबाबत थेट कर्जत पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आल्यावर तात्काळ अगदी दुसऱ्याचं दिवशी महिला बचत गटाला पापड बनविण्याचे मशीन देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोसावी, विलास खडे, रुपाली थोरवे, प्रमिला सावंत, सायली भोईर, प्रियांका खडे या सहा सदस्यांनी पोलखोल केली.
उकरुळ ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न चार लाख आहे आणि त्यातून 10 टक्के रक्कम महिला बालकल्याणवर खर्च करीत असताना पापड मशीन खरेदी केले. मात्र, ग्रामपंचायतीमध्ये 30 स्वयं सहाय्यता महिला बचत गट आहेत. त्यामुळे कोणत्या बचत गटाला सदर मशीन देणार हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही एका ग्राम संघाला ते मशीन देण्याचा निर्णय 18 जुलै रोजी घेतला आणि ते मशीन त्या ग्राम संघाला देण्यात आले. तर, अंगणवाडी केंद्रदेखील दोन असल्याने गणवेश वाटप करताना अडचणी येत होत्या. मात्र, गणवेश काही दिवसांआधी वाटप केले आहेत. दोन्ही वस्तूंचे वाटप करताना उशीर झाला आहे, हे मान्य आहे.
सुधीर लोहकरे, ग्रामविकास अधिकारी







