‘या’ शहराची होणार महापुरापासून सुटका; नदी स्वच्छतेचे काम सुरु

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या उल्हास नदीचे पाणी पावसाळ्यात महापूर आल्यानंतर शहरातील सखल भागात घुसते. उल्हास नदीच्या पात्रात अनेक वर्षे गाळ आणि झाडेझुडपे वाढली असल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे महापुराचे पाणी शहरात शिरते. दरम्यान, उल्हास नदीमधील गाळ आणि झाडे झुडपे बाहेर काढण्याचे काम गेली महिनाभर आ. महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरु असून, यावर्षी कर्जत शहराला महापुराचा धोका कमी बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्जत शहराच्या बाजूने वाहणार्‍या उल्हास नदीमुळे शहरातील नागरिक पावसाळ्यात सुखाने झोपत नव्हते. त्यावेळी तत्कालिन आ. सुरेश लाड यांनी उल्हस नदीच्या पात्रातील वर्षानुवर्षे साचून राहिला गाळ बाहेर काढण्याचे काम महिनाभर केले. त्यानंतर काही वर्षे कर्जत शहरातील सखल भागात महापूरचे पाणी कर्जत शहरात घुसले नव्हते. मात्र, मागील वर्षे अचानक कर्जत शहरात पाणी घुसले आणि मध्यरात्री नागरिकांची पळापळ झाली. त्यामुळे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी उल्हास नदीचे कर्जत आमराई भागातील पात्र गाळ तसेच अडथळे मुक्त करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

दरम्यान, गेली महिनाभर कर्जत शहरातील महापुराच्या पाण्याची समस्या सोडविण्याचा निर्धार आमदार थोरवे यांनी केला असून, यावर्षी उल्हासनदीच्या पात्रातून वेगाने पाणी खाली जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत शेकडो ट्रक माती आणि दगड उलहस नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे पायपुलाच्या खाली असलेली झाडेझुडपे हे काढून टाकण्यात आल्याने कर्जत शहरातील आमराई पुलाच्या खाली नदीचे पात्र अधिक खोलगट तसेच रुंद होण्यास मदत झाली आहे.

Exit mobile version