नदीतून बांधकामासाठी बिनधास्त पाणी वापर
पाटबंधारे विभागाला तक्रारीची प्रतीक्षा
| नेरळ | वार्ताहर |
रायगड, ठाणे जिल्ह्याची तहान भागवत उल्हास नदी ही पुढे खाडीला मिळते. या दोन्ही जिल्ह्यांतून बारमाही नदी वाहात असल्याने लाखो कुटुंबांची ती जीवनदायिनी आहे. तर शेकडो पाणी योजना या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, नेरळ भागात नदीच्या परिसरात उभे राहणारे मोठमोठे गृहप्रकल्प यांचा विळखा नदीला पडलेला असल्याचे चित्र आहे.
परिणामी, एका बाजूला बांधकामासाठी बिनदिक्कत पाण्याचा बेसुमार वापर या गृहप्रकल्पात बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्याने नेरळ कर्जतसारख्या शहरांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. दरम्यान, यावर नियंत्रण ठेवणारा पाटबंधारे विभाग मात्र तक्रारीची प्रतीक्षा करत आपले हात झटकण्याचे काम करत आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगार्ली धरणातून उल्हास नदीचा उगम होतो. धरणापासून 3 कि.मी. अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील 14व्या क्रमांकाचा प्रसिद्ध कुणे धबधबा आहे. पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंडिवडे, खांडपे, तमनाथ कर्जत, नेरळ, कोदिवले, दहीवली, बिरदोले, शेलू ही प्रमुख गावे व शहरांतून वाहात जाऊन पाषाणे येथून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. या नदीमध्ये टाटा विद्युत केंद्रासाठी वापरले जाणारे पाणी सोडले जाते. त्यामुळे ही नदी बारही महिने वाहत असते. त्यामुळे शेकडो पाणी योजना या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नेरळ दहिवलीच्या पुढे धामोते-ममदापुर भागातून नदीचा प्रवाह जात असताना त्याबाजूला अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत, राहात आहेत. अशात बांधकामासाठी नदीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. तर गृहप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखील नदीतून थेट पाईपलाईन टाकून पाणी उपसा केला जात आहे. अशा अनेक पाईपलाईन आणि मोटार उल्हास नदीत टाकण्यात आल्याचे चित्र आहे. तर यासाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता हा स्वतःच्या मर्जीचा उद्योग बांधकाम व्यावसायिक करीत आहेत.
नुकतेच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नदीची पाणी पातळी घटल्याने पाणीटंचाईचे संकट ओढवले होते. मात्र, दुसर्या बाजूला बिल्डर लॉबी मात्र बिनदिक्कत पाण्याचा वापर करताना दिसत आहे. तेव्हा यावर अंकुश कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा आता तरी शासनाच्या पाटबंधारे विभागाला जाग येणार का? याकडे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे.
आम्ही गृहप्रकल्पाला पाणी नदीतून उचलण्याची परवानगी देतो. त्यासाठी शासकीय रक्कम आकारली जाते. ते बिल संबंधितांकडून महिन्याला अदा करून घेतले जाते. मात्र, धामोते, भागात आम्ही कोणत्याही गृहप्रकल्पाला, बांधकामासाठी किंवा पिण्यासाठी पाणी घेण्याची परवानगी दिली नाही. तरी कुणी अनधिकृतपणे पाणी उचलत असेल आणि असा प्रकार आढळून आल्यास संबंधिताला नोटीस देऊन दंडाची तरतूद आहे ती करू.
भरत गुंटूरकर
उपअभियंता पाटबंधारे उपविभाग, कर्जत