उल्हास नदी ओव्हरफ्लो; ४० गावांचा संपर्क तुटला

दहिवली पुलावरून पाणी गेल्याने लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बांधकाम विभाग, नेरळ पोलिसांकडून पुलाची पाहणी

। नेरळ । वार्ताहर ।
सतत दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचले असून अनेक सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब राज्यमार्गावरील नेरळ-दहिवली पुलावरून पाणी गेल्याने सुमारे 40 गावांचा संपर्क तुटला असून पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सर्वत्र दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नेरळ-कळंब राज्यमार्गावरील नेरळ-दहिवली पूल कमी उंचीचा असल्याने या पुलावरून दरवर्षी पाणी जातो आणि अनेक गावांचा संपर्क तुटतो. बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस मोठया प्रमाणात सुरू असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे परिसरतील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

दहिवली पुलावरून पाणी गेल्याने कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तेथे एक कर्मचारी उभा करून तेथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून या पुलावरून कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. बांधकाम विभागासह नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, परिसरातील सरपंच चिंधु तरे, महेश विरले यांनी देखील पुलाची पाहनी करून पुलावरून प्रवास करू नये असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Exit mobile version