कामचुकार कर्मचार्यांची इतर विभागात पाठवणी
। ठाणे । प्रतिनिधी ।
उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ताकर विभागात वशिलेबाजीने कामाला लागलेल्या काही कर्मचार्यांना कोणताचा अनुभव नसल्याने तसेच कामचुकार प्रवृत्तीमुळे मालमत्ता करात कमालीची घट होत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ताकर वसुलीत वाढ होण्यासाठी तसेच विभागात काम पारदर्शक व्हावे याकरता अनुभवी हुशार कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व इच्छुक कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेऊन गुणवत्तेप्रमाणे कर्मचार्यांना घेण्याचे निश्चित केले आहे. आयुक्तांच्या या निर्णयमुळे अनुभवहीन आणि कामचुकार कर्मचार्यांना मोठा दणका बसणार आहे.
उल्हासनगर महापालिकेचे एकमेव आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ताकर विभागात गेली अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात घोळ आहे. शहरात 1 लाख 80 हजाराची मालमत्ता आहेत. त्याप्रमाणे वर्षाला 150 कोटींपेक्षा अधिक कर वसुली अपेक्षित असताना एप्रिलपासून आतापर्यंत 64 कोटींची वसुली झाली आहे. त्यात लागू करण्यात आलेल्या दोन अभय योजनेत 30 कोटींच्या वसुलीचा समावेश आहे. येत्या चार महिन्यांत हा आकडा 140 कोटीपर्यंत गाठण्याचा निर्धार मनपा आयुक्त ढाकणे यांनी केला आहे. त्यासाठी मालमत्ता कर विभागात अनुभवी आणि हुशार कर्मचार्यांची निवड केली जात आहे. त्यासाठी कर्मचार्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यमान कर्मचार्यांना काहीच येत नाही अशा वशिलेबाजांना विभागातून हलवण्यात येणार आहे.






