ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी अल्टिमेटम

21 मेपर्यंत अटक करण्याची आंदोलक कुस्तीगिरांची मागणी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना 21 मेपर्यंत अटक करा, अन्यथा आम्हाला काही ठोस निर्णय घ्यावा लागेल, अशी नवी भूमिका आंदोलक कुस्तीगिरांनी 31 सदस्यीय समितीने दिलेल्या सल्ल्यानंतर घेतली आहे.

आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलक कुस्तीगिरांनी एक नऊ सदस्यीय आणि दुसरी 31 सदस्यीय अशा दोन समित्यांची स्थापना केली आहे. यापैकी 31 सदस्यीय समितीने आम्हाला ब्रिजभूषण यांना 21 मेपर्यंत अटक करा, अशी भूमिका घ्यायला सांगितल्याचे विनेश फोगट म्हणाली. त्याच वेळी शेतकरी संघटनेचा आमच्या आंदोलनावर प्रभाव नसल्याचेही तिने सांगितले.

आंदोलक कुस्तीगिरांची रविवारी भारतीय किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, खाप महापंचायत 24 चे प्रमुख मेहर सिंह आणि संयुक्त किसान मोर्चाचे बलदेव सिंग सिरसा यांनी भेट घेतली. प्रत्येक खापचे सदस्य रोज सकाळी येथे येतील. दिवसभर आंदोलकांबरोबर राहतील आणि संध्याकाळी परत येतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच कुस्तीगिरांची समिती आंदोलनाबाबतचे निर्णय घेईल आणि आम्ही बाहेरून आंदोलनाला पाठिंबा देऊ, असेही टिकैत म्हणाले.

Exit mobile version