| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ चषक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जय हनुमान उंबरवाडी संघाने जिंकली. उंबरवाडी संघाने अंतिम सामन्यात जय हनुमान हालिवली संघाचा पराभव करून विजय मिळविला.
कर्जत पंचायत समिती माजी सभापती चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन वंजारपाडा येथील बादशाह ग्रुप आणि संकेत पाटील, दत्ता कमलाकर, नरेंद्र गोमारे आणि अविनाश बडेकर यांनी केले होते. दहीवली येथील लब्धी गार्डनसमोर आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती अमर मिसाळ यांच्या हस्ते झाले. कर्जत तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने खेळविली गेलेली ही स्पर्धा तालुक्यातील नामांकित 32 संघांमध्ये झाली.
या स्पर्धेचा अंतिम सामना जय हनुमान उंबरवाडी संघ आणि हालीवली या दोन संघांमध्ये झाला. चुरशीच्या अंतिम सामन्यात उंबरवाडी संघाने विजय मिळवित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर हालिवली संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.जय हनुमान पोशीर हा संघ तिसर्या, तर मानिवली संघ चौथ्या क्रमंकावर राहिला. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 22,000 रुपयांचे आणि उपविजेत्या संघाला रोख 15,000 आणि तिसर्या, चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी 7777 रुपयांचे पारितोषिक आणि माजी सभापती अमर मिसाळ चषक भेट देण्यात आला. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार उंबरवाडी संघाच्या विशाल गिरा या आदिवासी खेळाडूने पटकावला. त्याला सायकल भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तर, उत्कृष्ट बचावसाठी निशांत बोराडे, उत्कृष्ट चढाईसाठी रुपेश म्हसकर यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेला आ. महेंद्र थोरवे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी शिवसेना पक्षाचे मनोहर थोरवे, प्रसाद थोरवे, अंकुश दाभने, शरद ठानगे, राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे, एकनाथ धुळे यांच्यासह ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कैलास विरले, रवींद्र मिसाळ, सुनील विरले, विनोद माळी, जनार्दन निरगुडे, निलेश विरले, यांच्यासह बादशाह ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.