भाजी विक्रेत्यांना छत्रीचा आधार

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंड्यात भाजी मार्केटचा प्रश्न ऐरणीवर असून, संबंधित प्रशासन तो सोडविण्यास अपयशी ठरले आहे. गेले अनेक वर्ष भाजी विक्रेत्यांना ऐन उन्हाळ्यात सावलीसाठी तर पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

रेवदंडा शहर मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाजी विक्रेते व्यवसायासाठी ताजी भाजी उपलब्ध करीत असतात. ताजी भाजीसह कडधान्ये, चिंच, आंबे, सफेद कांदे, कलिगंडे, आजूबाजूच्या बागायतीमधील विविध फळे पारनाका येथील भाजी विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. सकाळचे कोवळे ऊन सरताच उन्हाळ्यातील कडक सुर्य किरणे डोक्यावर पडताच असह्य होते. अशा परिस्थितीत भाजी, फळे, कडधान्य आदी व्यवसाय साधणे फार जिकीरीचे बनते. पंचक्रोशीतून भाजी खरेदीसाठी ग्राहक येत असतात. त्यांना सुध्दा उन्हाचा त्रास सहन करत भाजी खरेदी करावी लागते.

रेवदंडा शहरात अनेक वर्ष भाजी मार्केट सुविधा नाही, त्यामुळे भाजी विक्रेत्यासह खरेदीदारांना सुध्दा उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. भाजी मार्केटप्रमाणे मच्छी मार्केटचा सुध्दा प्रश्न निर्माण झाला आहे. रेवदंडा हायस्कूलच्या बाजूच्या गल्लीत रस्त्यावर तसेच आत गल्लीत मच्छी विक्री व्यवसाय केला जात आहे. या ठिकाणी नित्याने बाहेरील वाहनांची कोंडी होते तर रेवदंडा समुद्रकिनारी ये-जा करताना पर्यटकांना सुध्दा अडथळा निर्माण होतो. रेवदंड्यातील भाजी व मच्छी मार्केट हे जिव्हाळ्याचे प्रश्न केव्हा सुटणार, असा प्रश्न पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत.

Exit mobile version