भाजी विक्रेत्यांना छत्रीचा आधार

रेवदंड्यात भाजी मंडईचा प्रश्‍न ऐरणीवर

| रेवदंडा | प्रतिनिधी |

ऐन उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात पारनाका येथील भाजी विक्रेत्यांना सावलीसाठी चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यामुळे रेवदंड्यातील भाजी मंडईचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेली अनेक वर्षे उन्ह आणि पावसापासून बचाव करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

रेवदंडा शहर मध्यवर्ती ठिकाण असल्याने पंचक्रोशीतील भाजी विक्रेते ताज्या भाजीसह कडधान्ये, चिंच, आंबे, सफेद कांदे, कलिंगड आदी शेतमालाची विक्री करण्यासाठी पारनाका येथे येत असतात. सकाळचे कोवळे उन्ह सरताच दुपारची कडक सूर्यकिरणे सहन होत नाही. अशा परिस्थितीत भाजी, फळे, कडधान्य आदींचा व्यवसाय करणे फार जिकिरीचे बनते.

रेवदंडा शहरात अनेक वर्षे भाजीमंडईची सुविधा नाही, त्यामुळे भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांनासुद्धा उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. भाजी मार्केटप्रमाणे मच्छी मार्केटचासुद्धा प्रश्‍न आहे. रेवदंडा हायस्कूलच्या बाजूलाच रस्त्यावर तसेच आत गल्लीत मच्छी विक्री व्यवसाय केला जात आहे. या ठिकाणी नित्याने बाहेरील वाहनांची कोंडी होते, तर रेवदंडा समुद्रकिनारी ये-जा करताना पर्यटकांनासुद्धा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रेवदंड्यातील भाजी व मच्छी मार्केट हे जिव्हाळ्याचे प्रश्‍न केव्हा सुटणार, असा प्रश्‍न पंचक्रोशितील ग्रामस्थ विचारत आहेत.

Exit mobile version