अंकुर स्पोर्ट्स, लायन्स क्लबची उपांत्य फेरीत धडक
| मुंबई | प्रतिनिधी |
अंकुर स्पोर्टस्, लायन्स क्लब, बंड्या मारुती या मुंबईच्या संघा बरोबर पुण्याच्या चांदेरे फाऊंडेशनने अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लायन्स स्पोर्टस् विरुद्ध अंकुर स्पोर्टस् आणि बाबुराव चांदेरे फाऊंडेशन विरुद्ध बंड्या मारुती मंडळ अशा उपांत्य लढती होतील. त्यानंतर अंतिम सामना होईल.
गोखले रोड दादर(प) येथील मंडळाच्या पटांगणातील मॅट वर सुरू असलेल्या स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेच्या चौथ्या दिवशी उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या अंकुरने मुंबईच्या ओम् पिंपळेश्वर संघावर 53-21 अशी सहज मात केली. पूर्वार्धातच दोन लोण देत 27-08अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या अंकुरने नंतर सावध केलं करीत प्रथम उपांत्य फेरी गाठली.
पुण्याच्या चांदेरे फाऊंडेशनने मुंबईच्या विजय क्लबचा प्रतिकार 40-28 असा मोडून काढला. सुरुवातीपासून गुण घेण्याचा सपाटा लावत पुणेकरांनी मुंबईकरांवर लोण देत 9-0 अशी आघाडी घेतली. पुन्हा 3 गुण घेत आपली आघाडी 12-00 अशी वाढविली. पहिल्या डावात 24-08 अशी भक्कम आघाडी चांदेरे संघाकडे होती. त्यानंतर विजय क्लबने आपल्या आक्रमणाची धार वाढवीत चांदेरे संघावर लोण देत ही आघाडी 17-29 अशी कमी केली. शेवटची 5 मिनिटे पूकारली तेव्हा 35-23 अशी पुण्याकडे आघाडी होती. शेवटी 12 गुणांच्या फरकाने त्यांनी विजय मिळविला.
तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या लायन्स क्लबने रायगडच्या मिड लाईनचा 39-20 असा लीलया पाडाव केला. पहिल्या सत्रात लोण देत 27-07 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या लायन्सने दुसऱ्या सत्रात संयमी खेळ करीत आपला विजय साकारला. शेवटच्या सामन्यात मुंबईच्या बंड्या मारुतीने ठाण्याच्या विजय स्पोर्टस् क्लबचा प्रतिकार 41-37 असा मोडून काढला. मध्यांतराला 27-10 अशी आघाडी घेणाऱ्या लायन्सला नंतर मात्र विजयने विजयासाठी चांगलेच झुंजविले. या अगोदर झालेल्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लायन्स स्पोर्टस्ने श्रीराम संघाला 50-35 असे तर विजय क्लबने गोलफादेवीचा 49-26 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.