मनसेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठी नळपाणी योजना राबविली जात आहे. जलजीवन मिशनमधून राबविण्यात येत असलेल्या या योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्याचवेळी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काम 50 टक्केहुन अधिक पेमेंट अदा करण्यात आले आहे. त्यामुळे संथगतीने सुरु असलेल्या कामाबद्दल आणि निधी लाटण्याचा प्रकार उमरोली नळपाणी योजनेच्या कामात सुरु आहे.
त्यामुळे या योजनेचे काम पाहणारे जीवन प्राधिकरण आणि संबंधित योजनेचे काम करणारे ठेकेदार यांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे, दरम्यान, कर्जत तालुक्यातील या योजनेचे ठेकेदार यांची चौकशी करून ठेकेदाराला काळया यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये जल मिशन योजनेच्या कामाचे उद्घाटन होऊन वर्ष होऊन गेले आहे. योजनेमधील बहुसंख्य कामे अपूर्ण स्थितीत आहेत. उमरोली ग्रामपंचायत हद्दीमधील प्रत्येक गावात जलकुंभ बांधण्यात येणार होती. आजपर्यंत कुठेही कामाची सुरुवात दिसून येत नाही. पाईपलाईन अर्धवट स्थितीत टाकण्यात आलेली आहे. तसेच, जलवाहिनी टाकताना नियम पायदळी तुडवून रस्त्याची नासधूस करून टाकलेल्या आहेत. कोषाणे या गावांमध्ये जलमिशन योजनेच्या पाईपलाईन जमिनीवरती ठेवण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यात यावी. शासनाने करोडो रुपये व्यर्थ घालवून संबंधित नळपाणी योजनेचे ठेकेदार चुकीच्या पध्दतीने कामे करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यात नळपाणी योजनेत अंतरभूत असलेल्या एकाही जलकुंभाचे काम अर्धेदेखील पूर्ण झालेले नाही.
नळपाणी योजनेच्या ठेकेदाराने केलेली कामे तसेच, त्या कामांची सर्वेक्षण न करता बिले अदा केली आहेत. त्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी आणि प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाने ते पेमेंट अदा करताना कामे पूर्ण झाली आहेत किंवा नाही याची खात्री केली नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्याची मागणी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.