| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उनाड गुरांचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी गुरांचे मुक्त संचार सुरू असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
उनाड गुरांचे मालक शहरातले नागरिक आहेत. पण गुरे नजरेत ठेवून नागरिकांना त्रास देत उनाड सोडली असल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य रस्ता, बसस्थानक परिसर, तसेच बाजारपेठेत ही गुरे थाटात फिरताना दिसतात. अनेकवेळा ही जनावरे वाहतूक अडवतात, दुकानदारांच्या समोर उभी राहून टाकाऊ पदार्थ खाऊ लागतात तसेच वाहनधारकांना त्रास देतात. रात्रीच्या वेळी या गुरांमुळे अपघातांची देखील नोंद झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगर पंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील स्वच्छता मोहीम, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य या तिन्ही बाबींवर या समस्येचा परिणाम होत आहे. नागरिकांचा सवाल आहे की, नगर पंचायत प्रशासनाने या उनाड गुरांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने मोहिम राबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.







