बांधकाम खात्याकडून नोटिसा
| नेरळ । प्रतिनिधी ।
मुंबई घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या सर्व जाहिरात फलक यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या बाजूला असलेले सर्व जाहिरात फलक हे अनधिकृत असून ते फलक काढण्यात यावेत अशा नोटिसा बांधकाम खात्याने बजावल्या आहेत.
कर्जत तालुका फार्म हाऊस आणि सेकंड होम यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लहान लहान रिसोर्ट उभे राहिले आहेत. या सर्व रिसोर्ट आणि फार्म हाऊस मध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेवून मुंबई येथून कर्जत तालुक्यात येणारे चौक आणि खोपोली येथील रस्त्यांच्या आजूबाजूला जाहिरात फलक यांचा गराडा पडला आहे. चौक ते कर्जत या नऊ किलोमीटर अंतरावर तब्बल 100हून अधिक जाहिरात फलक आहेत. त्यानंतर कर्जत चार फाटा येथील हुतात्मा भाई कोतवाल चौकात सर्वाधिक जाहिरात फलक उभे होते. मात्र, त्या ठिकाणी जंक्शन विकास कार्यक्रमसाठी शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. परिणामी अनधिकृत असलेले अनेक जाहिरात फलक सार्वजनिक बांधकाम खात्याने काढून टाकले. त्यापुढे कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व महत्वाच्या रस्त्यांच्या आजूबाजूला जाहिरात फलक उभे आहेत. नेरळ कळंब रस्त्यावर कोल्हारे साई मंदिर येथे देखील सर्वाधिक जाहिरात फलक असुन ते सर्व अनधिकृतपणे उभे आहेत.
मुंबई घाटकोपर येथील दुर्घटना घडल्यानंतर कर्जत तालुक्यातील जाहिरात फलक यांचा विषय समोर आला. कर्जत चार फाटा येथील अनेक जाहिरात फलक हे अपघात ग्रस्त स्थितीत उभे असून तेथे असलेलं सर्व जाहिरात फलक हे अनधिकृतपने उभे केलेले आहेत. त्या जाहिरात फलकावर जाहिराती लावून लाखो रुपये वर्षाला कमविले जात आहेत. मात्र, त्या बदल्यात शासनाला एक रुपयाचा देखील महसूल भरला जात नाही. त्यामुळे शासनाने सर्व अनधिकृत फलक काढून टाकण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांना दिले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील सर्व जाहिरात फलक काढण्यात यावेत अशी लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी दिली आहे. त्याचवेळी संबंधित नोटीस मध्ये अनेक जाहिरात फलक हे शासनाची परवानगी घेवून आणि रीतसर महसूल भरून उभे करण्यात आले नसल्याने तत्काळ काढून टाकण्यात यावेत. अन्यथा ते जाहिरात फलक सार्वजनिक बांधकाम विभाग हलावेल असेही नमूद करण्यात आले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग कडून दिलेल्या नोटीस मध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर त्यास संबंधित जाहिरात फलक मालक हे जबाबदार असतील असे स्पष्ट करण्यात आले आहेत. सर्व जाहिरात फलक हे राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांचे ठरवून दिलेल्या जागेमध्ये असल्याने त्यांना कोणीही परवानगी दिली नाही आणि शासन आपल्या जागेत जाहिरात फलक उभे करण्यास परवानगी देखील देणार नाही असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







