| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात शेतघराच्या नावाखाली अनाधिकृत बंगलो करून खरेदी-विक्रीचा सर्रास व्यवसाय सुरू आहे. सुधागड तालुक्यात विकासक मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करत असून बिनशेती न करता अनेक ठिकाणी शेतघरांच्या नावाखाली अनाधिकृत बांगलो बांधून खरेदी खरेदी-विक्री जोरदार सुरू असल्याचे समजते. सुधागड महसूल विभागाच्या कार्यालयात उपलब्ध माहितीनुसार दिनांक 5/3/2022 पर्यंत 480 अनाधिकृत शेतघरांची नोंद असून त्या अनधिकृत शेतघराच्या माध्यमातून अंदाजे एकुण 11768504 रुपयांचा दंड महसूल आकारले जाते. त्यापैकी दिनांक 5 मार्च 2022 रोजी पर्यंत 249 अनाधिकृत शेतघरांची 3371566 रूपयांची वसुली झाली असुन 231 अनाधिकृत शेतघरांची 8396938 रूपयांची वसुली बाकी असल्याची सुधागड तहसील कार्यालयाकडून उपलब्ध झाले माहिती समजते.
सुधागड तालुक्यात अनधिकृत बिनशेती बांधकामांना शेतघर ठरवून त्यांच्यावर किरकोळ दंडात्मककारवाई केली जाते. परंतु या शेतघरांची पाहणी केल्यास सदरची शेतघरे नसून अलिशान बंगले, फार्म हाऊस आहेत. अशा बांधकामांना वाणिज्य दराने कारवाई होणे गरजेचे असून मात्र अशा बांधकामांना शेतघरातच्या दंड आकारणी करून दंड वसुली केली जात आहे.अशा बांधकामवर शेतघराच्या दंडाची वसुली गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाचा मोठ्या स्वरूपात नुकसान होत असून अशा अनधिकृत शेतघरांची पाहणी करुन कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. दरवर्षी फक्त दंडात्मक कारवाई केली जाते.पण सुधागड तालुक्यात कृषक भूखंडाचे अकृषक मध्ये रूपांतर करून घर बांधकाम करण्यास प्रशासनच्या वतीने रितसर परवानगी दिली जाते. मात्र सुधागड तालुक्याच्या अनेक ठिकाणी कृषक भूखंडावर गेल्या दहा-बारा वर्षांत शेकडो अनाधिकृत शेतघरांचे बांधकामांना फक्त दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एकदा का कारवाई झाली कि आपली जबाबदारी संपली आशा पद्धतीने वर्षानुवर्षे दंडात्मक कारवाईची परंपरा जपत असल्याचे चित्रं सध्या सुधागड तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
अनधिकृत बिनशेती बांधकामांवर नियमित कारवाई केली आहे. त्यांच्यावर दंड देखील आकारण्यात येत आहे. आत्तापर्यंत अनेक अनधिकृत बिनशेती बांधकामे थांबविली आहे. नवीन अनधिकृत बिनशेती बांधकामांना नोटीसा देखील दिल्या आहेत. यापुढेही अशाप्रकारे कुठली ही अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही. प्रत्येकाने नियमांच्या अधीन राहून काम करणे आवश्यक आहे.
दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड