सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गुन्हा दाखल होण्याची शक्यता
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकी जागेत बागदांडा येथे अतिक्रमण करीत अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्काशीत करण्यात यावे,अशी मागणी तक्रारदार अलिबाग-मुरूड विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनय विनायक कडवे यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानुसार प्रशासनाने तक्रारीची दखल घेत तात्काळ बांधकामाला स्थगिती दिली होती. मात्र विनय कडवे यांनी पाठपुरावा केल्याने आता मिळकतखारमधील अनधिकृत बांधकाम करणारे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनमानी कारभाराने काम करणार्या ठेकेदाराला हे प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
अलिबाग तालुक्यातील मिळकतखारमधील बागदांडा येथील समुद्रकिनारी भरती रेषेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन आहे. या मिळकतीमध्ये तेथील ठेकेदाराने मनमानी कारभार करीत शासनाची फसवणूक करून अनाधिकृतपणे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. याबाबत अनेक स्थानिकांनी विचारणा करीत ठेकेदाराला जाब विचारला. मात्र ते काम जिल्हा परिषदेमधून मंजूर झाल्याचे सांगून ठेकेदाराने स्थानिकांची दिशाभूल केली. जिल्हा परिषदेकडून या जागेची माहिती घेतली असता, त्यांच्या मालकीची ही जागा नसून जिल्हा परिषदेकडून कोणत्याही प्रकारच्या संरक्षक भिंतीसाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संरक्षक भिंत उभारण्याच्या नावाखाली ठेकेदार वैयक्तीक फायदा करीत होता, ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. ई. सुखदेवे यांच्याकडे तक्रार करीत अतिक्रमण करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कषित करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
या घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संरक्षक भिंतीच्या नावाने सुरु केलेले काम थांबविण्यात आले. अनधिकृत बांधकाम हे अभिजीत कडवे यांनी केले आहे, असा स्पष्ट उल्लेख पंचलोकांच्या साक्षीने करण्यात आला असून बांधकाम करताना कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी घेतली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.अनधिकृत बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करून केल्याप्रकरणी संबधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली.
समुद्रकिनार्यावरील भरतीरेषेवरील मिळकतीवर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अभिजित कडवे तसेच गोरख कडवे यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता त्या ठिकाणी समुद्रालगत असलेल्या शासकीय जागेवर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले. तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करुन सीआरझेड क्षेत्र तसेच नॉन डेव्हलपमेंट झोनवर अनधिकृतपणे सिमेंट काँक्रीटची संरक्षण भिंत बांधण्याचे काम केले असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल आता बांधकाम विभागाने घेतल्यामुळे परवानगी न घेता करण्यात आलेले बांधकाम ठेकेदारांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिळकतखार ग्रामपंचायत हद्दीतील बागदांडा येथे किनारी संरक्षक भिंतीच्या नावाखाली करण्यात आलेले बांधकाम थांबविण्यात आले आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. तक्रारीनुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांसोबत चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
– तेलंग- उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग