‘भोगावती’मध्ये अनधिकृत बांधकाम?

जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; बोरगाव नागरिकांमध्ये संताप

| पेण | वार्ताहार |

भोगावती नदी पात्रात हॉटेल सौभाग्य ईनच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला असून, याठिकाणी रोजरोसपणे बांधकाम सुरू आहे. या बाबीकडे ना जलसंपदा खात्याचे लक्ष आहे, ना महसूल खात्याचे. आजच्या घडीला पेण-खोपोली मार्गावरील गणपती वाडीच्या पुलाजवळ नदीचे पात्र लहान झाले असून, भविष्यात याचा फटका बोरगाव ग्रामस्थ आणि पेण शहराला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पावसाळ्याच्या दिवसात भोगावती नदी दुथडी भरून वाहत असतेे; परंतु मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून ते भोगावती नदीच्या उगम स्थानापर्यंत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बड्या धेंड्यांनी अतिक्रमण केले आहे. तर, जलसंपदा विभाग व महसूल विभाग नदी पात्रात कुणी गरीबांनी घमेलीभर वाळू काढली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात. मात्र, गेल्या एप्रिल महिन्यापासून नदीपात्रात केलेले बांधकाम अधिकारी वर्गाला दिसत नाही अथवा ते जाणूनबुजून डोळेझाकपणा करत तर नाहीत ना? अधिकारी आणि बांधकाम करणार्‍या व्यक्तीचे काही साठेलोटे नाहीत ना, अशी चर्चादेखील सुरु आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीमध्ये केलेले अतिक्रमण अधिकार्‍यांना दिसत नसल्याने जलसंपदा खात्याचे अधिकारी झोपा काढत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

याविषयी महसूल खात्याकडे चौकशी केली असता महसूल खात्याला काहीच माहीत नसल्याचे समजले. तातडीने महसूल खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पाठवणार असल्याची प्रतिक्रिया तहसीलदारांकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली. तर, दुसरीकडे नदी पात्रात बांधकाम करत असणार्‍या कामगारांना कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी कुणी दांडेकर नामक व्यक्ती काम करत असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दांडेकर यांना संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माझं बांधकाम नदी पात्रात नाही, मी रितसर मोजणी केली आहे. परंतु, घटनास्थळी बांधकाम नदीपात्रात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच नदी पात्रातील मोठमोठाली झाडं जेसेबीच्या सहाय्याने खोदून काढल्याचे दिसत आहे. जर दांडेकरांच्या म्हणण्यानुसार, योग्य मोजणी करून जागा नदी पात्रात असेल, तर मग नदी पात्राची रुंदी कमी होती की काय? असेच म्हणावे लागेल. नदी पात्राची रुंदी ही वर्षानुवर्षे आहे तशीच आहे, मग अचानक दांडेकरांची जागा नदी पात्रात कशी निघाली, हा ही एक संशोधनाचा विषय आहे. जोपर्यंत महसूल खात्याकडून पंचनामा होत नाही, तोपर्यंत खरं काय, खोटं काय, ते समोर येत नाही. एवढे जरी निश्‍चित असले, तरी घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी नदी पात्रात भराव केल्याचे आढळून येत आहे.

Exit mobile version