आवास समुद्रकिनारी अनाधिकृत बांधकाम

सीआरझेडचे उल्लंघन, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

| अलिबाग | प्रतिनिधी |

पर्यटनासह धार्मिक स्थळांच्या दृष्टीने आवास गावाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. मात्र याच आवास गावातील समुद्रकिनारी काही मंडळी अनाधिकृतपणे बांधकाम करीत असताना स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पांडवादेवी मंदिराजवळ सीआरझेडचे उल्लंघन करीत बांधकाम करण्यात आले आहे, असा आरोप गावातील काही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पर्यावरण समतोलाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

आवास गावाची धार्मिक स्थळ म्हणून एक वेगळी ओळख आहे. नागेश्वरच्या यात्रेला मोठी गर्दी या ठिकाणी होते. उत्सवाचे स्वरुप या गावाला निर्माण होते. त्यात आवासचा समुद्रकिनारादेखील पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. या समुद्रकिनारी पर्यटक फिरण्यास येतात. परंतू या समुद्रकिनारी काही धनदांडगे बंगले अनाधिकृतपणे उभे करीत आहेत. त्यामुळे आवासच्या समुद्रकिनाऱ्याचे सैांदर्य नष्ट होण्याची भिती असून सतत होणाऱ्या भराव, व बेकायदेशीर बांधकामामुळे पुराचा धोकाही भेडसवण्याची चिंता निर्माण झाली आहे. अनेक वर्षापासून आवास येथील समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम व खोदकाम केले जात आहे. याबाबत स्थानिक प्रशासन, तलाठी व मंडळ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. या अनधिकृत बांधकामाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या आवास समुद्रकिनाऱ्यावर धनदांडग्यांनी मक्तेदारीच सुरु केली आहे. याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची सखोल खातेनिहाय चौकशी होण्याची मागणीदेखील केली जात आहे. अनाधिकृत बांधकामाना प्रशासनाचा वरदहस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. या बांधकामाबाबत नियोजन प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण विभाग यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. सीआरझेडचे उल्लंघन करीत होणाऱ्या बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी सुधाकर राणे, रुपेश राणे, जगन्नाथ घरत, संतोष नागवेकर, मच्छींद्र कवळे विश्वनाथ घरत, नैनेश राऊळ, सुरेंद्र कवळे, समिर पाटील यांच्याकडून मागणी केली जात आहे. याबाबत त्यांनी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, उपविभागीय अधिकारी चव्हाण यांना 11 जूलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनांतर तालुका व उपविभागीय प्रशासन काय भुमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version