वृक्षतोड करून विनापरवाना बांधकाम सुरू

हॉटेल उषा एस्कॉटचा प्रताप

| माथेरान | वार्ताहर |

धोकादायक ठरणाऱ्या झाडांबाबत रीतसर परवानगी घेऊन झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी वनखाते सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन परवानगी देण्याची शक्यता असते. परंतु, फक्त नाममात्र अर्ज दाखल करून आपल्या बांधकामास अडथळा ठरणाऱ्या झाडांची कत्तल करून बांधकाम करत असलेल्या हॉटेल उषा एस्कॉटच्या प्रतापामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

महात्मा गांधी मार्गावरील जैन मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत या हॉटेल व्यावसायिकाने विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी वर्गाकडून रीतसर परवानगी घेतलेली नसल्याने या हॉटेलधारकाने बांधकामास अडथळा ठरणारी झाडे काढून टाकण्यात यावीत याकामी फक्त अर्ज दाखल केला होता; परंतु आमच्या खात्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नव्हती, त्यामुळे याबाबतीत आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे, असे वन परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम यांनी सांगितले. याच हॉटेलधारकाने बिनधास्तपणे वृक्षतोड केल्यामुळे जे झोपडपट्टी भागातील रहिवासी पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत, त्यांनी साधी झाडांची फांदी तोडली तरी त्यावर सर्वच स्तरातून वनखात्याला फोन करून कारवाई केली जाते. तर या हॉटेलधारकाने बांधकाम परवानगी नसल्यामुळेच जागेभोवती पत्र्याचे कुंपण करुन गपचूप बांधकाम सुरू केले आहे, ज्याप्रकारे वृक्षतोड करून बांधकाम सुरू केले आहे, अशी कामे वनखाते त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने त्वरित थांबवावीत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Exit mobile version