अनधिकृत बांधकामांना ऊत

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील माणगावतर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट असून प्रशासकाच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामपंचायतमधील सर्व गावांमध्ये अनधिकृत कामांचा सुळसुळाट सुरु आहे. तर, प्रशासक हे बघ्याची भूमिका घेत असल्याने अनधिकृत बांधकामे वाढत आहेत आणि त्यासाठी प्रशासकांच्या कामाबद्दल गटविकास अधिकारी यांना महेश भागाच्या यांच्याकडून तक्रार करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी गावठाण/गुरचरण जागेवरती अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासन यांची बघ्याची भूमिका दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी येते म्हणून येथील लोक रस्त्यावर प्लॅस्टिक बांधत असतात. त्या प्लास्टिकचे रुपांतर पावसाळ्यानंतर पक्या स्वरूपात होत आहे. परंतु, या सर्व गोष्टीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणार्‍या भविष्यकाळामध्ये मोठ्या समस्या उद्भवणार आहेत.

Exit mobile version