खांदा वसाहतीत अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग

दुतर्फा वाहनांमुळे प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील खांदा वसाहत सेक्टर 6 परिसरात पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने पार्क करून ठेवली जात असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यालगत शाळा असल्याने विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रक, कंटेनर आणि इतर अवजड वाहने उभी राहात असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी, शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. शाळा सुटण्याच्या आणि सुरू होण्याच्या वेळी वाहतूक कोंडीही वारंवार होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांनी यापूर्वी या समस्येकडे संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाचे लक्ष वेधले होते. काही काळ कारवाई झाल्यानंतर पुन्हा अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना करून अवजड वाहनांचे पार्किंग तातडीने हटवावे, शाळेजवळ वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, पालक आणि शाळा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Exit mobile version