| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल शहरातील अभ्युदय बँकेजवळील परिसरात नवीन रेल्वे पूल सुरू झाल्यापासून नीलकंठ सोसायटी परिसरातील फुटपाथवर बाहेरून बँकेजवळ येणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग केली जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होत असून, स्थानिक रहिवाशांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याचबरोबर रस्त्याच्या कडेलाही मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग होत असल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. सेक्टर 18 मधील रोड क्रमांक 3 वरील फुटपाथवरही अनधिकृत पार्किंग सुरू झाल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनधिकृत वाहन पार्किंगची ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून फुटपाथवरील अनधिकृत पार्किंग हटवावे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षितपणे पायी चालता येईल यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, आणि पार्किंग व्यवस्था करावी अशी मागणी आदित्य जानोरकर, सचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस युवक (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
फूटपाथवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग
