रहिवासांची महानगरपालिकेकडे धडक कारवाईची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
खारघर वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे व राजकीय पुढार्याच्या आशिर्वादाने आठवडा बाजार व फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून याच्या विरोधात पनवेल महानगरपालिकेने धडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. पण याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याच्या विरोधात आता रस्त्यावर उतरुन पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरच आठवडा बाजार भरविणार असल्याचा इशारा युवा सेनेकडून देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन युवा सेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांनी पनवेल महानगरपालिकेला दिले असून यावेळी त्यांच्या सोबत युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, खारघर शहर अधिकारी विनोद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इतर शहरांसह खारघर वसाहतीमध्ये सेक्टर 2 पासून ते सेक्टर 21 पर्यंत खाद्यपदार्थ विक्रेते व कपडे विकणार्या फेरीवाल्यांनी सर्वच रस्ते व्यापून टाकले आहेत. हिरानंदानी, लिटील वर्ल्ड, बँक ऑफ इंडिया चौक, शिल्प चौक, नवरंग चौक, डेली बाजार या ठिकाणी फेरीवाले सकाळी व संध्याकाळी आपली दुकाने मांडून फुटपाथ व रस्त्यावर बसलेले असतात. याबरोबरच अनेक ठिकाणी आठवडे बाजार देखील सर्रासपणे चालू आहेत. याबाबत अनेकांनी पनवेल महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.
महानगरपालिकेच्या सुरूवातीच्या काळात असलेले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी खारघर रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविले होती व त्यांना यश सुद्धा मिळाले होते. परंतु सध्याचा अधिकारी वर्ग अशा प्रकारची मोहिम राबविण्यास का कचरत आहेत? असा सवाल करण्यात येत असून आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून खारघर वसाहत फेरीवाला मुक्त करावी अन्यथा येथील कार्यालया समोरच फेरीवाल्यांची दुकाने लावून युवा सेना आंदोलन छेडेल असा इशारा सुद्धा दिला आहे.