अनधिकृत वाळू उपसा

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
चिपळूण आणि खेड तालुक्यातील खाड्यांमध्ये वाळूचा अनधिकृत उपसा सुरू आहे. दिवसाला पाचशेहून अधिक ब्रास वाळू उपसली जात आहे. अनधिकृत उपसा करणार्‍या बोटी कोणाच्या आहेत, त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी चिपळुणातून होत आहे. चार बोटींनी वाळू उपसा करण्याची परवानगी असताना तब्बल शंभरहून अधिक बोटींनी वाळू उपसा सुरू आहे. कालुस्ते भागातील सरकारी आणि खासगी जागांवर वाळूचे डोंगर उभे केले जात आहेत. रात्री वाळू उपसा करणार्‍या बोटींच्या आवाजामुळे कालुस्ते परिसरात लोकांना झोप लागणेही मुश्कील होते.

वाशिष्ठी खाडीत वाळू उपसा करण्यासाठी दोन गटांत खनिकर्म विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांनी संपूर्ण खाडीत धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे चार बोटींनी वाळू उपसा करण्याची परवानगी असताना तब्बल शंभरहून अधिक बोटींनी वाळू उपसा सुरू आहे. चिपळुणातील वाळू व्यावसायिकांनी हातपाटीने वाळू उपसा करण्यासाठी आरक्षित असलेल्या गटांपैकी दोन गटात वाळू उपसा करण्यासाठी परवाना घेतला आहे. खनिकर्म विभागाकडून एका गटात दोन आणि दुसर्‍या गटात तीनशे असे एकूण पाचशे ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक रॉयल्टी भरून घेण्यात आली आहे. मात्र, परवाना नसलेल्या गटातही काही व्यावसायिकांनी वाळू उपसा सुरू आहे. दिवसरात्र शंभरहून अधिक बोटींनी वाळू उपसा केला जात आहे.

ज्यांनी शासनाची रॉयल्टी भरून रीतसर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर अवैध वाळू उपसामुळे अन्याय होत आहे. कालुस्ते भागातील सरकारी आणि खासगी जागांवर वाळूचे डोंगर उभे केले जात आहे. सध्या वाळूला मागणी जास्त असल्यामुळे आणि वाशिष्ठी खाडीतून वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कालुस्ते, गोवळकोट, भिले मार्गे दिवसरात्र वाळूच्या गाड्या धावत आहेत. चिपळूण परिसरातील वाळू व्यवासायिकांच्या बोटी खेड तालुक्याच्या हद्दीत जाऊन वाळू उपसा करीत आहेत. सकाळी खाडीत जाणार्‍या बोटी सायंकाळी किनार्‍यावर येतात आणि सायंकाळी जाणार्‍या बोटी पहाटे किनार्‍यवर येतात. प्लॉटवर वाळू रिकामी केल्यानंतर डंपरने भरून ती रत्नागिरीसह पश्‍चिम महाराष्ट्रात पाठवली जात आहे.

Exit mobile version