महापालिकेच्या शिक्षण विभागाचे आदेश
| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या धडक मोहिमेंतर्गत दिवा परिसरातील चार अनधिकृत शाळांना तीन दिवसांत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे नजीकच्या मान्यता प्राप्त शाळांमध्ये समायोजन करून, अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे आणि त्यांच्या 2 पथकांनी या अनधिकृत शाळांमध्ये अचानक भेट देत विद्यार्थी समायोजन कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
एस.आर. इंग्लिश स्कूल, एस.एस. मेमोरियल आणि एल.बी.एस. इंग्लिश स्कूल या चार शाळा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू असल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. त्यामुळे या शाळांनी जर तीन दिवसांच्या आत त्यांचे विद्यार्थी अधिकृत शाळांमध्ये समायोजित केले नाहीत, तर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून पोलिसांना घेऊन या शाळांवर थेट कायमचे सील मारण्यात येणार आहे, असा इशारा दिला गेला आहे.
महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या व अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सूचनेनुसार, शिक्षण विभागाने उपायुक्त संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईला गती दिली असून, दिवा भागातील कारवाई ही त्याचाच एक भाग आहे. शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी स्पष्टपणे सांगितले की, या शाळांनी शासनाची कोणतीही परवानगी, मान्यता न घेता विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षितता धोक्यात घातली आहे. गेल्या वर्षी सुमारे 81 अनाधिकृत शाळा सुरू होत्या. महापालिकेने गेल्या वर्षीपासूनच कडक कारवाई सुरू केल्याने यापैकी 34 शाळा यावर्षी बंद झाल्या आहेत. मात्र, उर्वरित 47 शाळा शासनाच्या व न्यायालयाच्या निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सुरू असल्याने या शाळांवर आता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात वाचून दुसरा उपाय राहिला नाही. त्यामुळे काल पहिल्या टप्प्यात दिव्यातील या चार शाळांवर धडक कारवाई करण्यात आली आहे व येत्या पंधरा दिवसांत उर्वरित सर्व शाळांवर अशीच धडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांचे अन्यत्र समायोजन करून त्या शाळा बंद केल्या जातील.