आग किंवा स्फोट झाल्यास जबाबदार कोण?
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरालगत असलेल्या निवासी वस्तीच्या शेजारी अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगाराच्या गोडाऊनमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, रबर, लोखंडी साहित्य, इलेक्ट्रॉनिक कचरा तसेच इतर ज्वलनशील वस्तूंचा साठा करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, अशा धोकादायक ठिकाणाला आवश्यक परवानग्या आहेत का, अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले जाते का, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
स्थानिकांच्या मते, गोडाऊनच्या अगदी शेजारी घरे असल्याने आग लागल्यास काही क्षणांत ती संपूर्ण वस्तीत पसरू शकते. विशेषतः पावसाळ्यानंतर उन्हाळ्यात अशा भंगाराच्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना राज्यात अनेकदा घडल्या आहेत. अशा परिस्थितीत महाडमध्येही मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
गोडाऊनमध्ये अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निशमन विभागाची परवानगी आणि सुरक्षा मानकांची पूर्तता झाली आहे का, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच नगर परिषद, महसूल प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अग्निशमन विभागाने संयुक्त पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी प्रशासनाने आताच कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित अनधिकृत गोडाऊनवर तत्काळ कारवाई करून निवासी भागातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
