ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेसमोर प्रशासन नरमले
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादादित टपऱ्या अखेर बुधवारी (दि. 20) जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली. यासाठी म्हाडा वसाहतीचे शेकडो रहिवासी अक्षरशः रस्त्यावर उतरले होते. उपोषणाच्या ईशाऱ्यानंतर संबंधीत प्रशासनाला जाग आली आणि टपऱ्या हटविण्याची कारवाई करण्यात आली. म्हाडा वसाहत ग्रामस्थ व महिलांच्या आक्रमक भूमिकेसमोर सार्वजनिक बांधकाम प्रशासन अक्षरशः नरमले हेच अधोरेखित झाले आहे.
मागील दीडदोन महिन्यांपासून अनाधिकृत टपऱ्या हटवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वच प्रशासनाच्या दारी पायपीट केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार दुर्लक्ष केले. दुसऱ्यांची जबाबदारी म्हणत टोलवाटोलवी केली. त्यातून ग्रामस्थांची सहजनशीलता संपली होती. अखेर संबंधीत प्रशासन विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी साखळी उपोषणाचा ईशारा दिला. सर्वांनी हा अनाधिकृत टपऱ्यांचा मुद्दा लावून धरला. यावेळी कायदा बचाव, अतिक्रमण हटाव, कोण म्हणतोय हटणार नाय, हटविल्याशिवाय राहणार नाय, अशा घोषणा उपस्थित शेकडो म्हाडा वसाहत ग्रामस्थांनी दिल्या.त्याच घडामोडींचा धसका घेत अनाधिकृत टपऱ्या हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम प्रशासन पुढे सरसावले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय बागुल यांनी बुधवारी अतिक्रमण टपऱ्या हटविण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार अनाधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या. याठिकाणी म्हाडा वसाहतीचे शेकडो पुरुष, महिला उपस्थित होते. जोपर्यंत अनाधिकृत टपऱ्या जमिनदोस्त करीत नाहीत, तोपर्यंत जागेवरून हटणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हाडा वसाहती समोरील अनधिकृत टपऱ्या हटवण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे म्हाडा वसाहती समोरील अतिक्रमण टपऱ्या हटाव मोहिमेला बुधवारी यश आले. ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अनाधिकृत टपऱ्या हटवाची मोहीम हाती घेऊन फत्ते केली.
पूर्ण कारवाई होईपर्यंत उपोषण
अनधिकृत टपऱ्यांच्या भरावामुळे पावसाचे पाणी वसाहतीत येत होते. शालेय विद्यार्थी व नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. आमचे सामाजिक स्वास्थ बिघडले. याबाबत संबंधीत प्रशासनाजवळ पत्रव्यवहार केला. मात्र, कोणीच दखल घेतली नाही. अखेर आम्ही ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले, पत्रकारांनी हा मुद्दा लावून धरला. टपऱ्यांमुळे रहदारीला धोका निर्माण झाला होता. मात्र, आता म्हाडा वसाहतीचा रस्ता मोकळा झाला आहे. पूर्ण कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ भिमेश भेकरे यांनी दिली.






