वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागणी
| उरण | प्रतिनिधी |
खोपटा रस्त्याच्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रात्री-अपरात्री भीषण वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. एकंदरीत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्याचा त्रास हा नाहक चाकरमानी, सर्वसामान्य प्रवासी नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना सहन करावा लागत आहे. त्यात क्षमतेपेक्षा जास्त मालाने भरलेले कंटेनर ट्रेलर हे खोपटा पुलावर उभे राहत असल्याने अवजड वाहनांचा भार हा खोपटा पुलाला असह्य होत आहे.
खोपटा पूल ते कोप्रोली या रस्त्यावरून उरण शहराकडे, जेएनपीए, द्रोणागिरी, तसेच औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य नव्याने सुरू असलेल्या काँक्रीटीकरण कामामुळे रात्री-अपरात्री या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ ही सुरू असते. त्यामुळे सदर रस्तावर भीषण वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा फटका हा चाकरमानी, सर्वसामान्य प्रवासी नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही बसत आहे. रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. अशा वाहतूक कोंडीमुळे क्षमतेपेक्षा जास्त मालाने भरलेले कंटेनर ट्रेलर हे खोपटा पुलावर उभे राहत असल्याने खोपटा पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कोप्रोली गाव कमिटीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आले नाही.
आमचे कर्मचारी सातत्याने त्या मार्गावर वाहतूक कोंडी करण्यासाठी सक्रिय आहेत. मात्र, एकच पूल चालू असल्याने आणि एकच रस्त्यातून वाहन चालत असल्याने वाहने ही स्लो असतात. त्यातच एक वाहन बंद पडले होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
-अतुल दहिफळे
उरण वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक






