19 जानेवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान स्पर्धा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीकडून 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. गतविजेता भारताचा पहिला सामना 20 जानेवारीला बांगलादेशशी होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती. पण नंतर ती आशियाई देशाबाहेर हलवण्यात आली. भारत, बांगलादेश, यूएसए, वेस्ट इंडिज, नामिबिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, आयर्लंड, स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया या 16 सहभागी संघांसह 41 सामने होणार आहेत.
गतविजेता भारत शनिवार, 20 जानेवारी रोजी ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगाँग ओव्हल येथे आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. 25 आणि 28 जानेवारीला पहिल्या फेरीत भारताचा सामना आयर्लंड आणि यूएसएशी होणार आहे. मुख्य स्पर्धेत जाण्यापूर्वी हे संघ 13 आणि 17 जानेवारीला दोन सराव सामने खेळतील. गतविजेता भारत ब्लोमफॉन्टेन येथे बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तर स्पर्धेचा पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात 19 जानेवारीला खेळला जाईल. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जातील.
‘ब’ गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. ‘क’ गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांचा समावेश आहे, तर गट ‘ड’मध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ यांचा समावेश आहे. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल 3 संघ पुढील फेरीत प्रवेश करतील.
उपांत्य, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस दुसऱ्या फेरीत एकूण 12 संघ असतील. प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर टॉप-4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.







