खा.सुनिल तटकरे यांचे यशस्वी प्रयत्न
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धनमध्ये एक हजार विद्युत मीटर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही मीटर्स मिळावीत यासाठी खा.सुनिल तटकरे यांनी महावितरणसोबत चर्चा केली होती. त्यांच्या प्रयत्नांना तातडीने यश आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. खा.सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध खात्यांच्या विकास कामांबाबत आढावा घेण्याकरिता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खात्यांचे अधिकारी,लोक प्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम, आरोग्य,खारलॅन्ड,एस.टी. महामंडळ, जि.परिषद, नगर परिषद इ.विभागांच्या विविध विकास कामांबाबत व त्यांच्या सद्यःस्थितीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत आनंद जोशी यांनी श्रीवर्धन महावितरण कार्यालयाकडे गेले बरेच महिने विजेचे मीटर्सच उपलब्ध नसल्यामुळे गरजू ग्राहकांना प्रत्येक मीटरसाठी दोन- अडीच रुपये मोजून खुल्या बाजारातून मीटर्स विकत घ्यावे लागत आहेत हे अन्यायाचे आहे असा गंभीर मुद्दा उपस्थित केला.त्याला दिवेआगरचे माजी सरपंच उदय बापट यांनीही याच संदर्भातील काही गंभीर उदाहरणे खा.तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
याची गंभीर दखल घेत खा तटकरे यांनी त्वरित महावितरणच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकार्यांस दूरध्वनीवरून मीटर्स तुटवड्यासंबंधीची देऊन तातडीने कार्यवाही करण्याचेही सूचित केले.आणि आश्चर्य म्हणजे खा.तटकरे यांच्या सुचनेवरुन महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयाकडून चोवीस तासांच्या आंत तातडीने श्रीवर्धन साठी एक हजार मीटर्स बदलण्यासाठी मिळाले आहेत, असे खा.तटकरे यांना कळविण्यात आले आहे.