अधिकारी, ठेकेदाराच्या बेजबाबदारपणा; अपूर्ण कामामुळे नागरिकांचे हाल
| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितेमुळे आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आजही पहिल्या टप्प्यातील अंडरपासचे काम अपुऱ्या स्थितीत असून, पाण्याखाली गेल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. ठेकेदार स्वतःची कातडी वाचविण्यासाठी पक्षांतरदेखील करु शकतो, हे नुकतेच जनतेने पाहिले आहे. त्यामुळे नक्की महामार्गाच्या कामाबाबत जबाबदार कोणाला ठरवायचं? शासनाला, ठेकेदाराला की बेजबाबदार अधिकाऱ्यांना, हा मोठा प्रश्नचिन्ह जनतेच्या समोर आहे.
2009 ला सुरु झालेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आजही पूर्ण स्थितीत नाही. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितेमुळे आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आजही पहिल्या टप्प्यातील अंडरपासचे काम अपुऱ्या स्थितीत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. साधारणतः पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यामध्ये अंडरपासची अवस्था काय आहे. याकडे अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष आहे. ठेकेदार जे.एम. म्हात्रे यांचे कर्मचारी मनमानेल तशी कामं करत आहेत. पेण तालुक्याच्या हद्दीचा विचार केल्यास पहिला अंडरपास जिते इथे आहे, तर दुसरा अंडरपास हमरापूर फाट्यावर आहे. त्यानंतर तिसरा अंडरपास हा तरणखोप बायपास इथे आहे. त्यानंतर अंतोरा फाटा, अंतोरा फाट्याच्या बरोबर दुसऱ्या मिनिटावर कोकण एज्युकेशनच्या लिटील एंजल स्कूलजवळ त्यानंतर रेल्वे स्टेशनसमोर, त्यानंतर रामवाडी, रामवाडीनंतर उचेडे, पुढे कांदळेपाडा, त्यानंतर बोरी फाटा, नंतर जेएसडब्ल्यू गोवा गेट, त्यानंतर गडब, कासू, आमटेम आणि कोलेटी येथील अंडरपासचे काम अपुऱ्या स्थितीत आहे. या एकूण पंधरा अंडरपासमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीच्या समोरील अंडरपास वगळता सर्वांची अवस्था खूपच दयनिय आहे. त्यामधून नागरिक आपला जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत.
पेण शहरालगत असणाऱ्या तरणखोप अंतोरा रामवाडी याठिकाणी दीड ते दोन-दोन फुटांचे खड्डे पडलेले आहेत. यामध्ये रामवाडी अंडरपासची अवस्था खूप बिकट आहे, तर लिटील एंजल स्कूलजवळील ज्या ठिकाणाहून विद्यार्थी ये-जा करतात, त्याठिकाणी कमीत कमी एक ते दीड फूट पाणी साचलेले आहे. या पाण्यामधून विद्यार्थ्यांना ये-जा करावा लागतो. पेण शहरालगत सर्विस रोड केलेत. परंतु, साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत, त्याचप्रमाणे अंडरपासमधील रस्त्याची उंची वाढवली नाही. तर, रेल्वे स्टेशनसमोरील अंडरपासशेजारी सर्विस रोड केला आहे. परंतु, साईडपट्टी न भरल्याने गाड्या जोरदार आपटत आहेत, तर दुचाकीस्वारांचा अपघातदेखील होत आहेत, ही स्थिती आहे. मात्र, याकडे ना ठेकेदाराचे लक्ष आहे, ना अधिकारीवर्गांचे. कालपर्यंत सत्ताधारी पक्षाचे काही कार्यकर्ते ठेकेदाराला दुषण लावत होते. परंतु, आत्ता ठेकेदारानेच कमळ हातात घेतल्याने त्या कार्यकर्त्यांचीदेखील आता बोलती बंद झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वालीच उरला नाही, असचं म्हणावे लागेल. शेवटी एवढेच खरं आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अश्वत्थामाच्या वाहत्या जखमेप्रमाणे वर्षानुवर्षे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भळभळत आहे.
जनतेचे हाल
याबाबत नॅशन हायवेचे अधिकारी यशवंत घोटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जे.एम. म्हात्रे कंपनीचे अभियंता धीरज पाटील यांच्याकडे फोन दिला. त्यावर धीरज पाटील यांनी सांगितले की, सर्व अंडरपासचे काम झाले आहे आणि झालेले नसेल तर मी बघू घेतो. एकंदारीत, ठेकेदारांना व ठेकेदारांच्या अधिकाऱ्याला सर्वसामान्य जनतेशी काही पडलेले नाही.