रूळ ओलांडणार्‍यांना समज

भिवपुरी रोड स्थानकातील घटना

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेचे मेन लाईनवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात प्रवासी रूळ ओलांडून जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. असे रूळ ओलांडून जाणार्‍या अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे रेल्वे राखीव दलाकडून असा रूळ ओलांडून जाणार्‍या प्रवाशांना एकत्र करून त्यांना समज देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील भिवपुरी रोड स्थानक येथे आजूबाजूला गावे आहेत आणि त्या ठिकाणी राहणारे प्रवासी हे रूळ ओलांडून आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रूळ ओलांडून जाणार्‍या अनेक प्रवेशांना यापूर्वी झालेले अपघात लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जतकडील भागात आणि मुंबईकडील भागासाठी लोखंडी बॅरिकेट्स उभारल्या गेल्या आहेत. तरीदेखील प्रवासी हे रुळावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे नियम डावलून प्रवासी रूळ ओलांडून जात असल्याबद्दल अनेक तक्रारी या मध्य रेल्वेकडे करण्यात येत असतात.

त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्जत येथील रेल्वे राखीव दलाकडून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कारवाई करण्यात आली. त्यावेळी उपनिरीक्षक प्रसाद चौगुले आणि स्थानक प्रबंधक शिवपुरी आहेर यांनी रूळ ओलांडून जाणार्‍या प्रवासी यांना एकत्र करून त्यांना रूळ ओलांडून जाणे किती धोकादायक आहे, याबद्दल माहिती दिली. त्याचवेळी काही प्रवाशांवर करावाईदेखील करण्यात आली असून, उपनिरीक्षक प्रसाद चौगुले यांनी सर्व प्रवाशांना रेल्वे नियमदेखील सांगितले आणि पुन्हा रूळ ओलांडताना आढळून आल्यास त्यांच्या दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निक्षून सांगितले आहे.

Exit mobile version