पेणकरांची प्रतीक्षा संपली! वीजपुरवठा पूर्ववत

। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब येथील मेन लाईनची केबल तुटल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तीन दिवसांनंतर पूर्ववत सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गडब येथील मेन लाईनची केबल येथील येथील मुंबई-गोवा महामार्गावरील हनुमान मंदिराजवळील नाल्यातून टाकण्यात आली आहे. ही केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. दोन दिवस वीजवितरण कंपनीचे कर्मचारी, ठेकेदारांचे कामगार व गावातील ग्रामस्थांनी खंडित वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. दोन ठिकाणी केबल खराब झाल्याने अखेर तिसर्‍या दिवशी नवीन केबल आणण्यात आली. ती टाकण्यासाठी ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना व ठेकेदारांचे कामगारांना सहकार्य करुन रात्री उशिरा खंडित वीजपूरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला. गडब येथील मेन लाईनच्या केबलची पाहणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अभियंता उमाकांत सपकाळे यांनी सांगितले.

Exit mobile version