आरजीपीपीएल बंद पडल्यास बेरोजगारी!

गुहागर | वृत्तसंस्था |
आरजीपीपीएल बंद पडल्यास सर्वांत मोठे नुकसान गुहागर तालुक्याचे होणार आहे. आज या तालुक्यातील 600 कुटुंबांची चूल प्रकल्पातील नोकरीवर चालते. सुमारे 80 जणांची कुटुंबे अप्रत्यक्षपणे प्रकल्पावर अवलंबून आहेत. याशिवाय गुहागर, दाभोळ आणि शृंगारतळीमधील आर्थिक उलाढालीवरही परिणाम होईल.
आरजीपीपीएलच्या मनुष्यबळ विभागातील एक त्रुटी म्हणजे एनटीपीसीचे 200 अधिकारी सोडल्यास सर्वजण कंत्राटी आहेत. या प्रकल्पात 95 टक्के कंत्राटी कर्मचारी, कामगार गुहागर व दापोली तालुक्यातील आहेत. कंपनी बंद पडेल तेव्हा एनटीपीसीच्या सर्व अधिकार्‍यांना अन्यत्र सामावून घेतले जाईल. पण, बेरोजगारीचे संकट येऊन कोसळले ते या कंत्राटी कामगारांवर. यापैकी अनेक कामगार गेली 10-15 वर्षे कंपनीत काम करीत आहेत. त्यांचा वयाचा विचार करता कोरोनाच्या संकटानंतर यांना नोकरी मिळणेही कठीण बाब आहे. परिणामी, या कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ शकते.
अंजनवेल, वेलदूर, रानवी परिसरातील काही मंडळी कंपनीच्या निवासी वसाहतीमध्ये दूध, भाजीपाला विकतात. जवळपास 25 महिला घरकाम करतात. कंपनीमध्ये 30 वाहने भाड्याने आहेत. कंपनीबाहेर पान टपरी, चहानाष्टा, किरकोळ वाणसामान यांची सात दुकाने आहेत. कंपनीत विविध साहित्य पुरवणारे 15 ते 20 स्थानिक व्यावसायिक आहेत. या सर्वांचा रोजगार बुडेल. आरजीपीपीएलच्या फंडातून कंपनीमध्ये बाल भारती पब्लिक स्कूल ही सीबीएससी बोर्डाची शाळा चालवली जाते. कंपनीच्या अधिकार्‍यांची सुमारे 100 मुले आणि गुहागर, दापोली तालुक्यातील 300 मुले येथे शिक्षण घेतात. कंपनी बंद पडली स्थानिक 300 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
आज कंपनीच्या निवासी वसाहतीमधील 200 कुटुंबे कपडे, किराणा, भांडीकुंडी आदी साहित्याची, वैयक्तिक बागबगिचासाठी लागणारी खते, बी-बियाणे, आदी खरेदी स्थानिक बाजारपेठेत करतात. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल थांबेल. अशा पद्धतीने एक कंपनी गेली तर एनटीपीसीपेक्षा मोठे नुकसान गुहागरचे होणार आहे.

Exit mobile version