| छत्तीसगड | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र असताना भाजपने या राज्यात जोरदार मुसंडी मारली. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा ठरला आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. विधानसभेच्या 90 जागांपैकी सत्ता स्थापन करण्यासाठी 46 जागांचा जादुई आकडा भाजपने सहज पार केला आहे. भारतीय जनता पार्टीने 56 जागांवर विजय मिळविला आहे. सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेसला 34 जागांवर विजय संपादित करता आला आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला चेहरा बनवला होता, त्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री टीएस सिंह आणि प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांच्या पराभवामुळे काँग्रेसला दुहेरी झटका बसला. तसेच मुख्यमंत्री भूपेश बघेल हे त्यांचा गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी बघेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील गरीब जनता, शेतकरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवून प्रचंड बहुमताने विजयी केलं आहे. या विशाल विजयासाठी मी छत्तीसगडच्या जनतेचे आभार मानतो. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
अमित शहा, गृहमंत्री
एकूण जागा -90
बहुमत – 46
भाजपा – 54
काँग्रेस – 36
अन्य – 0देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मोदींनी सामान्य माणसाच्या मनात जो विचार बिंबवला त्या विचारामुळे भाजपचा विजय झाला. या विजयाचं श्रेय मोदींचं आहे. त्यांच्या नावाचा हा करिष्मा असून अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्यासह त्या-त्या राज्यातील भाजपची जी टीम आहे त्यांचं हे श्रेय आहे. भाजपची मतं 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेली आहेत. विशेषतः छत्तीसगमध्ये 17 टक्के, मध्य प्रदेशात 8 टक्के आणि तेलंगणात 10 टक्के मतं वाढली आहेत. चारही राज्यांमध्ये मिळून 639 पैकी 339 जागा भाजप जिंकत आहे. हा अभूतपूर्व असा निकाल आहे. लोकसभेमध्येही मोठा विजय एनडीएला मिळणार आहे. इंडिया आघाडी आणि राहुल गांधीजींच्या अजेंड्याला लोकांनी नाकारलं आहे. आता इंडिया आघाडीची बैठक होईल, विजयाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जाईल. परंतु ते काहीही बोलले तरी जनता मोदीजींच्या पाठिशी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार नाही-शरद पवार
सातारा : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकलाचा परिणाम 2024 मध्ये होणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. ते साताऱ्यात बोलत होते. सध्या तरी मोदींना अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील पवार म्हणाले.
निकालांचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेण्ड सध्या दिसतोय हे मान्य केले पाहिजे. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही, तोपर्यंत मतदान यंत्रांना दोष देता येणार नाही.
बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभावाला सामोरे जावे लागणार आहे. राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम झाला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. नवीन लोकांना संधी द्यावी असा मतदारांचा कल दिसत आहे. दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर या विषयी बोलणार आहे, असेही पवार म्हणाले. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातील देता कामा नये, अशी सर्वांची भुमिका होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, नुकसान, दुष्काळ याकडे दुर्लक्ष होतय हे खरे आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने लक्ष घातले पाहिजेत, असे देखील शरद पवार म्हणाले.जनता काँग्रेसला हद्दपार करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि अमित शाह यांनी केलेल्या नियोजनामुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. घर घर मोदी, मन मन मोदी असा निकाल आपण पाहिला. जनतेने मोदींना साथ दिली आहे. मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारत तोडो यात्रा केली. राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते ते पूर्ण केले नाही. कर्नाटकमध्ये देखील असे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.