कुत्र्याला वाचवणे पडले महागात
| लखनऊ | वृत्तसंस्था |
उत्तरप्रदेशातील खुर्ज येथील फराणा गावातील राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकी याचा रेबीजने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ब्रिजेश प्रो कबड्डीत निवडीची तयारी करत होता.
त्याचा चुलत भाऊ शिवम यांनी सांगितले की, मार्च महिन्यात गावातील नाल्यात एक पिल्लू पडले होते. ब्रिजेशने ते बाहेर काढले, त्यानंतर पिल्लाने ब्रिजेशच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर ब्रिजेशने ती साधी दुखापत समजून त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला रेबीजविरोधी लस मिळाली नाही. त्यानंतर, त्याने सामान्यपणे कबड्डीची तयारी सुरू केली आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. काही दिवसांपूर्वी जेव्हा ब्रिजेशला त्याचा उजवा हात सुन्न झाल्याचे जाणवले आणि त्याला थंडी वाजू लागली. कुटुंबाला काहीही समजण्यापूर्वीच दुपारपर्यंत ब्रिजेशचे संपूर्ण शरीर सुन्न होऊ लागले.
त्यानंतर ब्रिजेशला प्रथम अलीगढ जिल्ह्यातील जीवन ज्योती रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले गेले. तिथे रेबीजची लक्षणे दिसल्यानंतर उपचार नाकारण्यात आले. त्यानंतर त्याला मथुरा येथील आयुर्वेदिक औषध केंद्रात नेण्यात आले. तिथे औषध दिल्यानंतर, ब्रिजेश काही काळ बरा झाला. परंतु, पुन्हा त्याची प्रकृती बिघडली, तेव्हा त्याला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी लक्षणांवरून रेबीजची पुष्टी केली आणि उपचाराने आराम मिळणार नसल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी, कुटुंब त्याला गावात परत आणत असताना, वाटेतच ब्रिजेशचा मृत्यू झाला.