। धुळे । प्रतिनिधी ।
धुळे शहरात भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पत्रकार हर्षद भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने वाहनास जवळपास अर्धा ते एक किलोमीटर फरफटत नेले, असे सांगण्यात येत आहे.
धुळे शहरातील गरताडबारी या भागाजवळ सोमवारी (दि.29) ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. पत्रकार हर्षद भदाणे पाटील (27) हे ज्या कारमध्ये बसले होते, त्या कारला एका भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. ट्रकने वाहनास जवळपास अर्धा ते एक किलोमीटर फरफटत नेले. हर्षद भदाणे यांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर भेदरलेल्या ट्रकचालकाने घटनस्थळाहून पळ काढण्याचा प्रयन्त केला. पण काही नागरिक ट्रकचालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते. यात त्याने अन्य वाहनांनाही धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.