| रायगड | प्रतिनिधी |
रेल्वे गाडीत चढताना किंवा उतरताना सुरक्षित अंतर बाळगणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा पुरेशी खबरदारी न घेता हयगय केल्याने जीवावर बेतण्याच्या घटना घडतात. माणगावमधील गोरेगावमध्ये नुकतीच अशीच एक दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मोमीनचा पाय रेल्वेखाली आल्याने अपघात झाला. यामध्ये त्याला त्याचा एक पाय गमवावा लागला आहे.
दिवा-रत्नागिरी पेसेंजर गाडी दिवावरून वीर अशी जात होती. भिवंडी येथील इयत्ता 9 वी मध्ये शिकणारा मोमीन अकबर कलाम हा याच गाडीतून प्रवास करत राजेवाडी-चांढवा येथील बोर्डिंग उर्दू शाळेत जात होता. मात्र, गोरेगाव येथे रेल्वे गेट क्र. 15 वर रेल्वे आल्यानंतर गाडी प्लॅटफॉर्मवर उभी राहायच्या पूर्वीच मोमीनने चालत्या गाडीतून बाहेर उडी मारली. यात पाय घसरून मोमीन खाली पडला. त्यावेळी त्याचा उजवा पाय गाडीच्या चाकाखाली आला आणि क्षणार्धात त्याच्या पायाचा तुकडा पडला. मोमीनला उपचारासाठी गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.गोरेगावकर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईतील केएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.