| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या हॉस्पिटल कॉलनीच्या आवारात खेळत असलेल्या मुलाचा तेथील विजेच्या खांबाला चुकून स्पर्श झाल्याने त्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.11) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मानव कुमार मुकेश पवार (13), मूळ रा. फतेहपूर (राजस्थान) सध्या रा. जिंदाल हॉस्पिटल कॉलनी, सुकेळी या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिंदाल हॉस्पीटल कॉलनीमध्ये व सुकेळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागोठणे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय मुलगा जिंदाल हॉस्पिटल कॉलनीच्या बाहेर असलेल्या मैदानात कॉलनीतील इतर मुलांसोबत खेळत असताना या मैदानालगत असलेल्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला मोठा शॉक लागला. त्यानंतर या मुलाला लगेचच रोहा येथील डॉ. जाधव नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून, पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेती जिंदाल कंपनीच्या इलेक्ट्रिक विभागातील संबंधित दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.







