दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
| माणगाव | प्रतिनिधी |
ताम्हिणी घाटात रविवारी (दि.11) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. माणगाव पोलिसांना सुरुवातीलाच घातपात असल्याचा संशय आल्याने त्या दृष्टीने तपास करत याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
माणगाव तालुक्यातील पुणे-दिघी महामार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावानजिक सीक्रेट पॉईंट जवळ रविवारी (दि.11) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. फिर्यादी हे कामानिमित्त त्या ठिकाणी गेले असता 25 ते 30 वर्षे, वयोगटातील पुरुष निपचिप अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तात्काळ माणगाव पोलिसांना संपर्क साधला. त्यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावर, डाव्या बाजुच्या खांद्याच्या खाली, गळ्याला व डोक्याला जखमा झालेल्या दिसल्या. तसेच, जमिनीवर सुखलेल्या रक्ताचे डाग दिसले. परंतु, या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. या मृत व्यक्तीच्या अंगावरील खुणा पाहून घातपात असल्याचा संशय माणगाव पोलिसांनी आला. त्यानुसार माणगाव पोलिसांनी शोध घेऊन पुणे येथून आरोपी अनिकेत महेश वाघमारे (26) आणि तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (24) यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.





