। रेवदंडा । प्रतिनिधी ।
थेरोंडा खंडेरावपाडा समुद्रकिनारी 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा समुद्राच्या पाण्यात वाहून आलेला मृतदेह सापडला. रेवदंडा पोलिसांनी तातडीने दखल घेऊन पंचनामा केला व मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील थेरोंडा खंडेरावपाडा येथे समुद्र किनारी समुद्राचा लाटावर वाहून आलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (दि. 27) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सापडला. सदर मृतदेह अरबी समुद्राचा लाटाबरोबर वाहत येऊन समुद्र किनाऱ्यावर आला असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली. रेवदंडा पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, मृतदेह बराच कालावधीत समुद्राच्या पाण्यात असल्यामुळे, जलचर प्राण्याने कुरतडलेला व अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आहे. या अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्षे, उंची सुमारे 160 सेमी, अंगात हिरव्या रंगाचे गोल गळ्याचे हाफ टिशर्ट त्यावर गोल्ड कप, सिरिज असे वर्णन आहे. या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोविंद मडावी हे करीत आहेत. या व्यक्तीची माहिती उपलब्ध झाल्यास किंवा सदर मयत इसमास ओळखत असल्यास रेवदंडा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन रेवदंडा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकांत किरविले यांनी केले आहे.







