शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश

600 महिला शिवणार एक लाख विद्यार्थ्यांचे गणवेश

| रायगड । सुयोग आंग्रे |

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार आहेत. यंदा प्रथमच निधीऐवजी महिला आर्थिक विकास महामंडळाला (मआविम) थेट कापड देऊन गणवेशाची शिलाई होणार आहेत. जिल्ह्यातील ‘मआविम’कडील बचत गटांमधील सुमारे 600 महिला गणवेश शिवणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्याचे नियोजन आहे.

रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील एक लाख 389 विद्यार्थ्यांना 2024-25 च्या शैक्षणिक वर्षात प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्यात एक स्काऊट गाइडचा तर दुसरा नेहमीचाच गणवेश असणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार बचत गटांमधील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. एक गणवेश शिलाई केल्यावर सुमारे 120 रुपये मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात महिला आर्थिक विकास महामंडळाकडील 600 महिलांकडे जिल्ह्यातील एक लाख गणवेश शिलाईचे काम येणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दुसर्‍या गणवेशासाठी कापड येणार आहे. विशेष बाब म्हणजे यंदा विद्यार्थ्यांच्या अंदाजित मापानुसार राज्य स्तरावरूनच कटिंग केलेले कापड ‘मआविम’ला पाठविले जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या अंतरंगात असणारे युनिट पूर्ण जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, अलिबाग येथील युनिट कार्यतत्पर यंत्रणेसह गणवेश शिलाईसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. या युनिटमधील तब्बल 600 महिलांना गणवेश शिलाईचे काम देण्यात येणार आहे. चार-पाच दिवसांत विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कापड आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत दोन लाख 778 गणवेश शिलाई केले जाणार आहेत. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाकडे कापड उपलब्ध झाल्यानंतर तातडीने गणवेश शिलाईचे काम सुरु केले जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version