| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक असून नेहमीच या बँकेत सेवेचा बोजवारा पहावयास मिळत आहे. येथील ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध होण्यास दिरंगाई आणि वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरान हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. आताच्या डिजीटल युगात सहसा कुणीही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत नसल्याने पर्यटक माथेरानमधी युनियन बँकेच्या भरवशावर अवलंबून असतात. परंतु, या बँकेचे एटीएम नेहमीच तांत्रिक कारणास्तव अथवा नेटवक नसल्यामुळे बंद असते. याच बँकेची छोटी शाखा एका कुटूंबाकडे देण्यात आली असून त्याठिकाणी सुद्धा अनेकदा सर्व्हर डाऊन असते. त्यामुळे काही व्यवहारांची कामे पूर्ण होत नाहीत. येणाऱ्या पर्यटकांना एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाजारात काही वस्तूंची खरेदी करता येत नाही. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमधून देखील या बँकेच्या अकार्यक्षम सुविधेबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये अन्य एखादी राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध व्हावी, जेणेकरून ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







