अज्ञात इसमाचा वृद्धावर जिवघेणा हल्ला

दोन दिवसांनंतर पोलिसांत गुन्हा दाखल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
65 वर्षीय वृद्धावर अज्ञात इसमाने जिवघेणा हल्ला करीत अर्धमेले करुन टाकले होते. दोन दिवस उपचाराविना तडफडत पडलेल्या या वृद्ध व्यक्तीचा मुलगा घटनास्थळी पोहचल्यानंतर झाला प्रकार उघडकीस आला. दोन दिवस जखमी अवस्थेत पडून राहिलेल्या या वृद्ध व्यक्तीला ना मालकाने रुग्णालयात हलविले ना त्याच्या नातेवाईकांना कळविले. त्यामुळे याप्रकाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वृद्ध इसमावर हल्ला होऊन देखील आरोपीला पोलिस पकडू शकत नसल्याने ज्येष्ठ नागरिक असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
नाना यशवंत पाटील, (65) रा.नांगरवाडी अलिबाग हे आंबेवाडी येथील आब्बास बेबन रा. रामराज यांच्या नारळ आंब्याच्या वाडीमध्ये कामाला आहेत. ते रविवारी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र रात्रीनंतर देखील ते घरी परतले नाहीत. दुसर्‍या दिवशी सोमवारी देखील ते घरी न आल्याने त्यांचा मुलगा निलेश पाटील हे वाडीमध्ये पहाण्यासाठी गेले असता. तेथे जखमी अवस्थेत आपले वडिल पडलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी मालकाकडे चौकशी केली असता त्यांनी काहीच माहिती दिली नाही. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आपले वडिल हे आपल्या कामाच्या ठिकाणी मुक्कामी असताना रात्रीच्या सुमारास झोपेतच असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मारहाण केली. या मारहाणीत नाना पाटील यांच्या तोंडाला, कानाला, डोळयाजवळ गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या शैलेश पाटील यांची तक्रार न घेता अलिबाग येथे गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले. तर अलिबाग पोलिस ठाण्यातून रेवंदडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देत टोलवाटोलवी करण्यात आली. अखेर दोन दिवसांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल करताना भादंवि कलम 324 कलम लावण्यात आले आहे. मात्र अमानुषपणे जिवघेणा हल्ला करुनही साधे कलम लावल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. चार दिवस नाना पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्लेखोर व्यक्ती समोर आली तर आपण त्याला ओळखू शकतो असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून आरोपीला गजाआड करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version