रायगड रस्त्यासाठी विनापरवाना पाणीउपसा

22 गावांवर संभाव्य पाणीटंचाई
स्थानिक ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

। महाड । प्रतिनिधी ।
किल्ले रायगड रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून ठप्प होते. या कामास पुन्हा सुरुवात झाली असून, याकरिता लागणारे पाणी गांधारी नदीतून घेतले जात आहे. या परिसरातील ज्या गावांना गांधारी नदीतील जॅकवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो, अशा ग्रामपंचायतींनी संभाव्य पाणीटंचाईच्या भीतीने पाणीउपसा करण्यास विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन परिसरातील ग्रामपंचायतींनी प्रशासनाला दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी लाखो शिवभक्त दरवर्षी येत असतात. महाडपासून रायगड रस्ता अरुंद आणि वळणदार असल्याने या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होते. यासाठी महाड रायगड रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण शासनाकडून मंजूर करण्यात आले. महाड रायगड हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. सिमेंट काँक्रिटच्या माध्यमातून दोन पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. याचे काम 2019 पूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने हे काम अर्धवट अवस्थेत ठेवून पळ काढला होता. यामुळे या कामाची पुन्हा निविदा काढून संबंधित ठेकेदाराला बदलण्यात आले व नवीन ठेकेदार नेमण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कामाकरिता लागणारे पाणी गांधारी नदीतील जॅकवेलशेजारी उपसा करून टँकरने घेतले जात आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला असून, गांधारी नदीमधील पाणीसाठा कमी झाला असल्याने जॅकवेल कोरड्या होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. यामुळे सदर पाणीउपसा तात्काळ बंद केला जावा, अशी मागणी निवेदनाद्वारे दिली आहे.
यावेळी महाड पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद मांडवकर, पहूर ते सरपंच बईकर, त्याचबरोबर नाते विभाग शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय सावंत, बंधु तरडे, दासगावचे सरपंच दिलीप उकिर्डे यांनी महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांची भेट घेऊन वरील समस्या सांगितली व संबंधित ठेकेदाराला नदीतील पाणी वापरण्यास बंदी घालावी अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट केले.

महाड रायगड मार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने अद्याप जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेतलेली नाही. यामुळे गांधारी नदीतून पाणीउपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल. – रमेश चितळकर, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, महाड

दररोज एक लाख लीटर पाणीउपसा
महाड तालुक्यातील वाळसुरे, चापगाव, तळोशी, खर्डी, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, नाते, किंजलोळी बुद्रुक, गांधार पाले, साहिल नगर, वहूर, दासगाव व महाड शहर या गावांना कोतुर्डे धरणातील पाण्याचा पुरवठा केला जातो. सदरचे पाणी महाड रायगड रस्त्याचे काम करणारे ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन हे वापरत असल्याने दर दिवशी सुमारे एक लाख लीटर पाण्याचा वापर केला जातो. सुमारे तीन महिने या पाण्याचा वापर केला जाणार आहे. भविष्यात वरील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. तसेच गांधारी नदीदेखील कोरडी पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरील सर्व गावान करिता पाणी आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी महाडचे तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे करण्यात आली आहे.

Exit mobile version