अनलॉकमुळे माथेरानच्या पर्यटनाला बहर

वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्किंगची अपुरी व्यवस्था, वन संरक्षक समिती, वनखात्याचे दुर्लक्ष
माथेरान | वार्ताहर |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमी पर्यटनासाठी बंदी घालण्यात आलेले माथेरान आता पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटनासाठी अनलॉक करण्यात आल्याने माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत असून, वाहतूक कोंडीच्या समस्याही निर्माण झाली आहे. त्यातच पार्किंगच्या अपुर्‍या व्यवस्थेमुळे काही पर्यटकांनी माथेरानमध्ये न जाता माघारी फिरणे पसंत केले.

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दि.26 जूनपासून माथेरानची टाळेबंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे माथेरानमधील पर्यटन नव्याने बहरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणार्‍या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

पावसाळ्यात माथेरानची नेरळ ते माथेरान दरम्यान मिनिट्रेन सेवा चार महिने बंद असते त्यामुळेच एकमेव असणार्‍या या घाटमार्गावरून मोटार वाहनांची रेलचेल सुरू असते. लॉक डाऊन काळात पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. केव्हा एकदा हे लॉक डाऊन उठते याच प्रतीक्षेत असणार्‍या स्थानिकांना नुकताच आठ दिवसांपूर्वी पर्यटकांना प्रवेश देण्यात आल्यामुळे सर्वानाच चांगल्या प्रकारे व्यवसाय निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

लॉक डाऊन नंतर पहिल्याच शनिवारी या सुट्टीच्या दिवशी दस्तुरी नाक्यावर वाहनांची संख्या वाढली होती त्यामुळे कित्येक गाड्या या तिसर्‍या वळणापर्यंत घाटात लावण्यात आल्या आहेत आणि तेथून एक ते दीड किलोमीटरची सामान घेऊन पर्यटकांनाआपल्या लहान लहान मुलांना घेऊन पायपीट करावी लागत आहे. तर बहुतेक गाड्या ह्या जागेअभावी माघारी गेल्या आहेत. याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.

वनखात्याच्या आणि वन समितीच्या अयोग्य नियोजनाच्या अभावामुळे नाहक त्रास येणार्‍या पर्यटकांना सहन करावा लागत आहे. याकामी वनखात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने सुध्दा सदरची बाब गांभीर्याने घेऊन पर्यटकांना होत असलेल्या अडचणींवर लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

लॉकडाऊनमध्ये घरात बसून बसून आमचे कुटुंब खूपच कंटाळून गेले होते. आमचे आवडते ठिकाण म्हणजे नेहमीचेच माथेरान आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गाने सुट्टयांच्या हंगामात तरी पार्किंगची व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी जेणेकरून कुणालाही माघारी जायची वेळ येता कामा नये हीच अपेक्षा.
पी. एच. उपाध्याय, पर्यटक मुंबई

Exit mobile version