आरोग्य उपकेंद्रावर अनाठायी खर्च

महाड तालुक्यातील कांबळे गावातील प्रकार
वापर होत नसल्याने केंद्र धुळखात पडून
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट आहे. तर काही आरोग्य उपकेंद्रावर लाखो रूपये खर्च केले जात आहेत. तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी मधील आरोग्य केंद्र वापराविना धुळ खात पडले आहे. इमारतीच्या रंगरंगोटीवर मात्र ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत खर्च करण्यात आला आहे.
महाड तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र तालुक्याचा विस्तार पाहता याठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण असल्याने आरोग्य उपकेंद्र सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यामध्ये 27 आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यापैकी 8 आरोग्य उपकेंद्र ही राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अंतर्गत पंधरा इमारती रागगड जिल्हा परिषदेने बांधल्या आहेत. यातील छत्री निझामपुर या ठिकाणी राजिपने आरोग्य केंद्राची इमारत बांधली होती. परंतु सदरचे आरोग्य उपकेंद्र कधीही उघडले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अशाच प्रकारे महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाडमध्ये बांधण्यात आलेले आरोग्य उपकेंद्र गेली चार ते पाच वर्षापासून बंदच अवस्थेत आहे. 2020 मध्ये या आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आला मात्र हा खर्च देखील वाया गेला असून सुविधांच्या अभावामुळे आरोग्य कर्मचारीच नसल्याने ग्रामस्थ देखील आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत.

या आरोग्य उपकेंद्रावर लाखो रूपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील काही कामे अर्धवट असल्याने याचा वापर होत नाही. यामुळे ग्रामस्थांना अन्य ठिकाणी उपचाराकरिता जावे लागत आहे. वारंवार याबाबत तक्रारी केल्या आहेत. पण अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याने अशांवर कारवाई केली जावी.
राघोबा महाडिक,सरंपच कांबळे तर्फे महाड

Exit mobile version