एसटी महामंडळाचा नियोजनशून्य कारभार

ग्रामीण भागातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द

| रोहा | प्रतिनिधी |

एसटी महामंडळ व रोहा आगार प्रमुखांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका चाकरमानी व सामान्य प्रवाशांना बसला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बोरिवली, ठाणे व कल्याण या प्रमुख शहरांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून सलग तीन दिवस 30 विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे रोहा एसटी स्थानकातून ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या रद्द केल्याने आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई, ठाणे व इतर शहरांतून आलेल्या अन्य चाकरमान्यांना एसटी स्थानकात भरपावसाळ्यात ताटकळत बसावे लागले. गावी जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी व चाकरमान्यांचे खूप हाल झाले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत, ठाणे, गुजरात व अन्य प्रमुख शहरांतून हजारो गणेशभक्त सण साजरा करण्यासाठी रोह्यात रेल्वे व खासगी बसद्वारे येत असतात. रोह्यात आल्यानंतर पुढील प्रवासाकरिता एसटी स्थानकातून ग्रामीण भागात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. रोहा एसटी स्थानकातून तांबडी, घोसाळे, भालगाव, विरजोली त्याचप्रमाणे तळा, म्हसळा, मुरुड या तालुक्यांतील गणेशभक्त एसटीने प्रवास करत आपापल्या गावी जातात. मात्र, यावर्षी रेल्वेने आलेल्या प्रवाशांची त्यांच्या गावी जाण्याची वाट बिकट झाली आहे.गेली तीन दिवस रोहा आगारातील गाड्या ह्या मुंबईमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाठविल्या असल्यामुळे रोहा बस स्थानकवरून ग्रामीण फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे, एसटी तसेच विविध मार्गाने आलेले मुंबईकर व रोह्यात खरेदीसाठी येणारे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

आधीच रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग व महामार्गावर पडलेले खड्डे, तासन्‌‍तास होणारी वाहतूक कोंडी याला वैतागलेले प्रवासी रोहापर्यंत रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देत आहेत. गेली कित्येक वर्षे पिठोरी पूजन झाल्यावर मुंबई व अन्य शहरातील नागरिक रोह्यात येऊन पुढे तळा, म्हसळा, मुरुड या तालुक्यातील आपल्या गावी कुटुंब कबिल्यासह प्रवास करतात. ते त्यांना सोयीस्कर व आर्थिकदृष्ट्या परवडणारे असते. रोहा तालुक्यातील भालगाव, दापोली, कोकबन या ग्रामीण भागातील नागरिक गणपती खरेदीसाठी रोहा बाजारपेठेत येतात. याच दरम्यान शनिवार ते सोमवार या बाहेर गावाहून येणारी प्रवासी संख्या व तालुक्यातील नागरिकांचे खरेदीच्या दिवसात रोहा आगारातून ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या या बंद ठेवल्या आहेत. आता रोहा बस स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता ग्रामीण फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आगारप्रमुखांनी करणे गरजेचे होते. मात्र, एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे गणेशभक्तांना एसटी स्थानकाच्या आवारात ताटकळत बसावे लागले.

प्रवाशांना नाहक त्रास
रोहा आगार प्रमुखांच्या या नियोजनाशून्य कारभारामुळे गणेशभक्तांना रोह्यातून रिक्षा व अन्य खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

यावर्षी रोहा आगार कार्यालायातून बोरिवलीकरिता 22, ठाण्याकरिता सात व कल्याणकरिता एक अशा 30 गाड्या कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी बुक केल्याने रोहा ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र, प्रवाशांच्या सोयीप्रमाणे तीन गाड्या रोहा आगारात उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

अजिंक्य रोहेकर,
आगार व्यवस्थापक, रोहा

Exit mobile version