। माथेरान । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये जवळपास 47 कोटी रुपयांची सांडपाणी प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नसल्याने संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत कामे उरकण्यासाठी सपाटा लावल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माथेरान या पर्यटनस्थळावर मोठया प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री असून वाढत्या लोकसंख्येमुळे घरगुती लोजिंगसुध्दा असून या सर्वांचे सांडपाणी कड्यालगत डोंगरात सोडले जाते. या दूषित पाण्यामुळे आजूबाजूला असणार्या धरणांत हे पाणी जात असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांडपाणी प्रकल्प राबविण्यात येत असून एकूण 47 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पाच टक्के वाढीव दराने ठेकेदाराला देण्यात आला आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी ज्या क्षमतेचे मोठया व्यासाचे पाईप अपेक्षित होते ते लावण्यात आलेले नसून जेमतेम सहा इंचाचे पाईप लावण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री त्याचप्रमाणे लोजिंग आणि रेसिडेंसी भागातील सांडपाणी या लहानशा पाईपमधून जाऊ शकत नाही. त्यामुळे आगामी काळात वारंवार रस्त्यांची खोदाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अगोदरच एस्टीपी प्रकल्पाच्या ठेकेदाराने ज्या भागातून पाण्याची कनेक्शन गेली आहेत त्याच ठिकाणी सांडपाण्याचे पाईप लावण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनमधून हे सांडपाणी जाऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
विशेष म्हणजे या महत्वकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू असताना प्रशासनाचा एकही अधिकारी कामांची पाहणी करताना दिसत नाही.
राहुल इंगळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद
आम्ही तांत्रिक बाबी तपासून घेत आहोत. तांत्रिक मुद्द्यांप्रमाणे कामे करणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची काळजी घेतली जाणार आहे.
ए. बी. पाटील, एमजेपी, कार्यकारी अभियंता पनवेल
आमच्या पाण्याच्या चेंबरमध्ये सांडपाणी पाईप कसे काय टाकू शकतात? हे दोन्ही वेगवेगळे पाईप एकाच चेंबरमध्ये येऊच शकत नाहीत. त्यांनी अन्य ठिकाणी खोदाई करून सांडपाणी पाईप लावावेत. सध्या ज्या पद्धतीने ही पाईप लाईन टाकण्यात येत आहे हे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केले जात आहे.







